काझीरंगा अभयारण्यात पुरामुळे 225 प्राण्यांचा मृत्यू


आसाममध्ये आलेल्या पुरात जगप्रसिद्ध काझीरंगा अभयारण्यही वाहून गेले आहे. आतापर्यंत या पुरामुळे किमान 225 प्राण्यांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो प्राण्यांनी इतरत्र पलायन केले आहे, असे अभयारण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काझीरंगा अभयारण्यात पुरामुळे मेलेल्या प्राण्यांमध्ये 15 गेंडे, 185 हरिण आणि किमान एक बंगाली वाघ आहे. भयंकर पुरामुळे संपूर्ण काझीरंगा अभयारण्य पाण्यात बुडाले आहे.

“प्राण्यांचे मृतदेह जागोजागी पाण्यात तरंगताना दिसत आहे. हे मनाला वेदना देणारे दृश्य आहे,” असे काझीरंगा अभयारण्याचे संचालक सतेंद्र सिंह यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला सांगितले.

काझीरंगा अभयारण्याचा विस्तार सुमारे430 चौरस किलोमीटर असून त्यातील 80 टक्के भाग पाण्याखाली बुडाले आहे. काही प्राणी महामार्ग ओलांडून उंच जागी पोचले आहेत. गेंड्यांना शिकाऱ्यांपासून वाचविण्यासाठी सरकारने राजमार्गांवर सुरक्षा रक्षक नेमले आहेत. मात्र येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारण्याची आशा असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये पुरात मेलेल्यांची संख्या 144 आहे, तर पश्चिम बंगालमध्ये आणखी 60 जणांचा मृत्यू झाला आहे.