‘या’ खातेदारांकडून एसबीआयची 235.06 कोटींची वसुली


सर्वात मोठी बँक ऑफ इंडियाने(एसबीआय) बँकेतील 388.74 लाख खात्यांमध्ये निश्चित किमान मासिक रक्कम न ठेवणाऱ्यांकडून 235.06 कोटी रुपये वसूल केले आहेत. चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीच्या काळात हा दंड वसूल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील नीमच येथील कार्यकर्ते चन्द्रशेखर गौड यांनी एसबीआयकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत ही माहिती मागविली होती. त्यात त्यांना बँकेनेच ही आकडेवारी दिली आहे, असे पीटीआयने म्हटले आहे.

एसबीआयने 5 ऑगस्ट रोजी गौड यांना पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे, “30 जून 2017 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीदरम्यान किमान मासिक रक्कम न ठेवल्याबद्दल 235.06 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत आणि अशा खात्यांची संख्या 388.74 लाख आहे.’’

विशेष म्हणजे बँकांतील बचत खात्यांमध्ये किती किमान रक्कम हवी, याबाबत रिझर्व्ह बँकेने कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत. गौड यांनीच केलेल्या अन्य एका माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. मात्र अशा बँकेकडून वसुली करण्यासाठी काही अटी निश्चित केल्या आहेत. त्यानुसार संबंधित ग्राहकाला किमान एक महिन्यांची मुदत देणे आवश्यक आहे.

Leave a Comment