भाजपचे मिशन ३५०


काल शरद यादव यांच्या पुढाकाराने १७ राजकीय पक्षांची संयुक्त जाहीर सभा झाली आणि तिच्यात संघटित होऊन भाजपाचा पराभव करण्याचे ठरवण्यात आले. या संघटित शक्तीचा नेता कोण याचा निर्णय झाला नसला तरीही आपल्या एकत्रित शक्तीतून आपण भाजपाचा सहज पराभव करू शकू असा विश्‍वास त्यांच्यात व्यक्त करण्यात आला आहे पण हा सारा प्रयास सुरू असतानाच भारतीय जनता पार्टीही निवडणुकीच्या मन:स्थितीत आल्याचे स्पष्ट झाले. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षाची वरिष्ठ स्तरावरील बैठक घेतली आणि तिच्यात २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने ३५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असल्याचे सांगितले.

भाजपाचे उद्दिष्ट मोठे आहे हे खरे पण ते कसे साध्य करता येईल याचे गणित मांडणारे प्रेझेंटेशनही शहा यांनी दाखवले. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २०१४ सालच्या निवडणुकीप्रमाणे यश मिळणार नाही याची जाणीव पक्षाला आहे. विजयाचे फोल दावे पक्ष करीत नाही. अमित शहा यांचे जागांचे गणित पक्के आहे. पक्षाला ज्या राज्यात फारसे स्थान नाही अशा राज्यांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, आदि राज्यांत मिळून २१६ जागा मिळालेल्या आहेत. यातील महाराष्ट्र आणि बिहार या दोन मोठ्या राज्यातल्या निवडणुकीचे गणित आता बदलले आहे. बिहारात नितीशकुमार आता सोबत राहणार आहेत आणि महाराष्ट्रात शिवसेना सोबत राहणार नाही. यामुळे या २१६ जागांचे गणित आता बदलेल.

या राज्यात आता २०१४ प्रमाणे यश मिळणार नाही असे गृहित धरून अमित शहा यांनी आता नव्या प्रदेशांत प्रयत्न करून कमी होणार्‍या जागांची कसर भरून काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या दृष्टीने प. बंगाल, तामिळनाडू, केरळ, ओरिसा या चार राज्यांवर लक्ष केन्द्रित करण्याचा मानस आहे. यातल्या तामिळनाडूत भाजपाला फार यश मिळण्याची शक्यता कमीच आहे पण तिथे प्रभावी असलेला अद्रमुक पक्ष आता भाजपाचा मित्र झाला आहे. ओरिसाच्या पंचायत निवडणुकांनी पक्षाची उमेद वाढवली आहे तर बंगालमधील निवडणुकीने ती कमी केली आहे. भाजपाने मित्र पक्षांना न दुखावता ३५० चे उद्दिष्ट गाठण्याचे ठरवले आहे. ते बरेच दूरचे आहे. हतबल झालेला कॉंग्रेस पक्ष ही भाजपाची जमेची बाजू झाली आहे. २०१४ साली ज्या जागांवर भाजपा उमेदवार दुसर्‍या किंवा तिसर्‍या क्रमांकावर होता त्या जागांवर लक्ष ठेवण्याचे धोरण त्याच दृष्टीने उपयुक्त ठरेल असे वाटते.

Leave a Comment