भारतीय वंशाच्या संशोधकाच्या नेतृत्त्वाखाली उडत्या कारचे संशोधन


मायक्रोसॉफ्ट कंपनीत भारतीय वंशाचे वैज्ञानिक आशीष कपूर या संशोधकांच्या नेतृत्वाखाली उडणार्‍या कारचे किंवा ग्लायडरचे संशोधन सुरू असून या ग्लायडरच्या नेवाडा येथे घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून ही स्वतःच उडणारी व स्वतःचे नियंत्रण स्वतः करू शकणारी ग्लायडर विकसित केली गेली आहेत. हवेत उडू शकणार्‍या अशा दोन ग्लायडरच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

जगभर सध्या स्वयंचलित चालकविरहीत कार्सवर मोठे संशोधन सुरू आहे. मायक्रोसॉफ्टने मात्र त्याच्यापुढे पाऊल टाकून स्वयंचलित उड्त्या कार्सवर लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रकल्पाअंतर्गत तयार करण्यात आलेली ग्लायडर्स हवेची गती, तापमान, वार्‍यांकडून होणारा प्रतिकार लक्षात घेऊन हवेत किती उंचीवर उडायचे याचा निर्णय घेतात व ती दिवसचे दिवसच नाही तर महिनाभरही उडू शकतात. त्यांचा उर्जेचा वापरही अत्यंत कमी आहे. याचा मुख्य उपयोग हवामान अंदाज, शेतांतील पिकांची पाहणी, ज्या भागात इंटरनेट नाही तेथे ते उपलब्ध करून देणे यासाठी होऊ शकतो. तसेच अन्य अनेक कामातही त्यांचा वापर होऊ शकणार आहे.

Leave a Comment