
शकुंतलेची गोष्ट म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर लगेच कालिदासाने लिहिलेली, दुष्यंताची शकुंतला उभी राहते. पण ही गोष्ट त्या शकुंतलेची नाही. हे गोष्ट आहे ती अश्या एका शकुंतलेची, जी १९१० पासून अस्तित्वात आली. ही गोष्ट आहे शकुंतला रेल्वेज ची. आपल्यापैकी फार थोड्या जणांनी शकुंतला रेल्वेज बद्दल ऐकले असेल. हा एकच असा रेल्वे मार्ग आहे जो भारतीय रेल्वे महामंडळाच्या अधिपत्याखाली येत नाही. १९५२ साली जेव्हा सर्व रेल्वे लाईन्स चे राष्ट्रीकरण झाले तेव्हा शकुंतला रेल्वेजचा यामध्ये समावेश का केला गेला नाही याचे कारण तितकेसे स्पष्ट नाही.

आताशा आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा बुलेट ट्रेन्स भारतामध्ये येत असतनाच शकुंतला रेल्वेज हे जुन्या काळाचे चालते बोलते प्रतीक, आजही ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांच्या कौतुकाचा विषय बनून राहिले आहे. ही प्राचीन रेल्वे महाराष्ट्रामधील मुर्तझापूर ते यवतमाळ ह्या मार्गावरील १९० किलोमीटर चा प्रवास ताशी २० किलोमीटर च्या गतीने पूर्ण करीत असते. यवतमाळ आणि अमरावती मधील गोरगरिबांची ही जीवनरेखा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

१९१० चे दशक, खासगी रेल्वे कंपन्या स्थापिल्या जाण्याचे दशक होते. तेव्हाच, १९१० साली किलिक – निक्सन या ब्रिटीश कंपनीने शकुंतला रेल्वेज ची स्थापना केली. ब्रिटीश सरकारच्या सहाय्याने त्यांनी सेन्ट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी सुरु करून, विदर्भामध्ये रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम सुरु केले. या रेल्वेमार्गाने कापसाची निर्यात करण्याचा त्यांचा मानस होता. १९१६ साली हा रेल्वे मार्ग तयार झाला आणि त्यानंतर लवकरच मालवाहू ट्रेन्स बरोबरच प्रवासी ट्रेन्स ही या मार्गावर धावू लागल्या. या मार्गावरील ट्रेन्स ग्रेट इंडियन पेनिन्स्युलर रेल्वे या कंपनीद्वारे चालविल्या जात असत.
गोष्ट शकुंतला रेल्वेची
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व रेल्वेमार्गांचे राष्ट्रीकरण झाले. पण शकुंतला रेवेज ह्यातून वगळली गेल्यामुळे, आजही शकुंतला रेल्वेज, सेन्ट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी ची खासगी मालमत्ता आहे, आणि ही कंपनी किलिक – निक्सन ब्रिटीश कंपनीच्या मालकीची आहे. त्यामुळे शकुंतला रेल्वेज ही खासगी ट्रेन भारतीय रेल्वे महामंडळाच्या रेल्वे मार्गावर धावते असे म्हणायला हरकत नाही.

या ट्रेन चे इंजिन ZD स्टीम इंजिन असून, ते १९२१ साली मँचेस्टर येथे बनविले गेले होते. हे इंजिन १९२३ साली रेल्वे च्या सेवेत रुजू झाले, आणि तेव्हापासून ते १९९४ पर्यंत हे इंजिन होते. त्यानंतर १९९४ मध्ये या ट्रेन ला डीझेल इंजिन देण्यात आले. आज हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या भुसावळ डिव्हिजन च्या अधीन आहे. पण मुर्तझापूर ते यवतमाळ हा ११३ किलोमीटर चा मार्ग आणि मुर्तझापूर ते अचलपूर हा ७६ किलोमीटर चा मार्ग आज ही सेन्ट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनी यांच्या मालकीचा असल्यामुळे, मध्य रेल्वेला या मार्गांवर ट्रेन चालविण्यासाठी सेन्ट्रल प्रोव्हिन्स रेल्वे कंपनीला मानधन द्यावे लागते. शकुंतला रेल्वे चा प्रवास आज ही नॅरो गेज चा आहे. आणि यवतमाळ ते अचलपूर प्रवास पूर्ण करण्यासाठी तिला २० तास लागतात. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या रेल्वे मार्गाचे रुपांतर ब्रॉड गेज मध्ये करण्यासाठी आर्थिक तरतुदीला मान्यता दिली असल्याने लवकरच मार्गाचे ब्रॉड गेजमध्ये परिवर्तन केले जाईल.
