नवी दिल्ली – केंद्र सरकार देशाच्या सुरक्षेसाठी बलिदान देण्यास सदैव सज्ज असणा-या जवानांना स्वस्त दरात वस्तू पुरवणारी सीएसडी कॅन्टिन आता ऑनलाईन करण्याची योजना आखत आहे. यासोबतच सरकारचा वर्तमान सीएसडी कॅन्टिन डेपोंची संख्या वाढवण्याचाही मानस आहे. सीएसडीने ऑनलाईन बाजाराच्या वाढत्या लोकप्रियतेची दखल घेत आपल्या १.२ कोटी ग्राहकांना ही सुविधा पुरविण्याची योजना आखली आहे. पण ही सुविधा तूर्तास व्हाईट गुड्स अर्थात रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन सारख्या मोठ्य़ा वस्तूसाठीच ऑनलाईन सुविधा उपलब्ध असणार आहे.
सरकार जवानांच्या घरी पोहचवणार स्वस्त वस्तू
या योजनेच्या अंमलबजावणीस येत्या दिपावलीपर्यंत सुरुवात होण्याची शक्यता आहे. आपल्या भागीदार कंपन्यासोबत मिळून कॅन्टिन स्टोर्स डिपार्टमेंट (सीएसडी) व्हाईट गुड्स खरेदी प्रक्रियेतील वेळेची बचत तसेच ग्राहकांची असुविधा कमी करण्याच्या दृष्टीने प्रारूप आराखडय़ाची निर्मिती करत आहे. नवीनतम वस्तूंची श्रेणी आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देणे हा यामागील प्रमुख उद्देश असून वर्तमान व्यवस्थेत ते शक्य होत नसल्याचे सीएसडीकडून सांगण्यात आले आहे.