जवसाच्या चटणीचे फायदे


आयुर्वेदामध्ये जेवणात विविध प्रकारचे पदार्थ असावेत असे म्हटलेले आहे. विविध प्रकारचे म्हणजे विविध चवीचे पदार्थ नव्हे तर विभिन्न पोषणमूल्यांचे पदार्थ. जेवणात सगळ्या प्रकारचे पदार्थ असावेत आणि त्यांच्यात सातत्याने बदल होत राहिला पाहिजे, असे आयुर्वेदात म्हटलेले आहे. विशेषतः भारतामध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढत चालल्यामुळे तो आटोक्यात यावा यासाठी काय करता येईल यावर आधी विचार केला पाहिजे. कारण भारतात हृदरोग्यांची संख्या वाढत चालली आहे आणि हृदयविकाराचा झटका येण्याचे वय ४० ते ५० वरून २५ ते ३० असे झाले आहे. जगभरात हे प्रमाण कमी व्हावे यासाठी अनेक प्रकारची संशोधने केली जात आहेत आणि उपायही सांगितले जात आहेत. त्यातल्या त्यात प्रगती केलेल्या यूरोप खंडात हे उपाय प्रभावीपणे अंमलात आणले जात आहेत.

त्यामुळे यूरोप खंडातील हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण गेल्या २० वर्षात कमी झाले आहे. याच काळात भारतात मात्र हृदयविकाराचा प्रादुर्भाव झालेल्या लोकांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन नसणे, विश्‍वासार्ह वैद्यकीय उपचार न अवलंबिणे इत्यादी अनेक कारणे त्यामागे असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. मात्र एवढे करूनही भारतात हृदरोग्यांची संख्या दुपटीने वाढली आहे. त्यावर अनेक डॉक्टर आणि वैद्य फार मोठे नियंत्रण आणू शकलेले नाहीत. यामागचे कारण काय याचा धांडोळा जगभरातले डॉक्टर घेत आहेत आणि ते अशा निष्कर्षाप्रत आलेले आहेत की, भारतीय लोक एकच प्रकारचे खाद्य तेल वारंवार वापरतात हे त्यांना होणार्‍या हृदविकारामागे असलेल्या कारणातील मोठे कारण आहे.

त्यामुळे आपले खाद्य तेल वारंवार बदलले पाहिजे. भारताच्या काही भागात शेंगादाण्याचे तेल वापरले जाते. तर विशेष करून उत्तर भारतात मोहरीचे तेल खाण्यासाठी वापरतात. ज्या भागात शेंगादाण्याचे तेल वापरले जाते त्या भागातले याच तेलाची सवय झालेले लोक शेंगादाण्याचेच तेल सातत्याने वापरतात. अशा लोकांनी काही दिवस शेंगादाण्याचे तेल तर काही दिवस मोहरीचे तेल तर अधूनमधून करडीचे तेल वापरून तेल अधूनमधून बदलण्याचा पायंडा पाडला पाहिजे. एकाच प्रकारचे तेल वारंवार वापरल्याने त्याचे चरबीत रुपांतर होते आणि ही चरबी रक्तवाहिनी आणि त्वचा यांच्यामध्ये अडकून चिमटली जाते. तिथे चरबी जास्त झाली की माणसाचे आयुष्य एकसुरी आणि एकतर्फी होते. तेव्हा अशा लोकांनी अधूनमधून सोयाबीन तेल तसेच इतरही खाद्यतेले आवुर्जन वापरली पाहिजेत.