हरवली आणि अशी सापडली ही अंगठी


आपल्या सर्वांच्याच छोट्या मोठ्या वस्तू अनेकदा हरवत असतात. कधी त्या सापडतात तर कधी अजिबातच त्यांचा थांगपत्ता लागत नाही. मात्र जिवलगाने दिलेली अंगठी हरविण्याचा चटका वेगळाच असतो. कॅनडातील एका महिलेला हा अनुभव नुकताच आला. तिची हरविलेली अंगठी अगदी वेगळ्याच रूपात पुन्हा सापडली.

अलबर्टा सिटीमध्ये राहणार्‍या मेरी ग्रॅम्स या महिलेला १३ वर्षांपूर्वी तिच्या नवर्‍याने हिर्‍याची अंगठी भेट दिली होती. मेरी ती नेहमीच घालत असे मात्र पतीने २००४ साली दिलेली ही अंगठी तिच्याहातून बागेत काम करत असताना हरवली. मेरीने तिचा खूप शोध घेतला पण ती सापडली नाही. पण आपल्या नवर्‍याला अंगठी हरविल्याचे समजले तर त्याला फार वाईट वाटेल म्हणून मेरीने अंगठी हरविल्याचे त्याला सांगितले नाही व मुलांकडून याच अंगठीसारखी नकली अंगठी बाजारातून आणवली व मेरी तीच अंगठी वापरत होती.

नुकतीच मेरी तिच्या बागेतून भाजी काढत होती तेव्हा गाजर उपटताना एका गाजराच्या मधोमध अडकलेली मूळ अंगठी मेरीला दिसली व तिच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. तिने सर्वांना त्यावेळी प्रथमच घडलेली हकीकत सांगितली. अंगठी मिळाल्याचा आनंद मेरीच्या चेहर्‍यावर फुलून आला होता मात्र त्याचवेळी तिचे डोळे अश्रू गाळत होते कारण या मधल्या काळात ही अंगठी देणार्‍या तिच्या पतीचे निधन झाले होते.

Leave a Comment