येथे खरोखरच भरतो गाढवांचा बाजार


एखादे कार्यालय, संस्था येथील कर्मचारी कामचुकार किंवा जादा अडविणारे असतील तर आपण सर्वसाधारणपणे अमुक तमुक कार्यालय किंवा जागा म्हणजे गाढवांचा बाजार आहे असा शब्दप्रयोग अनेकदा करतो. मात्र भारतात गेली ५०० वर्षे खराखुरा गाढवांचा बाजार भरतो. राजस्थानमधील जयपूरजवळ असलेल्या भावगढ बंध्या या गावात आक्टोबरमध्ये हा बाजार भरविला जातो. या बाजाराचे वैशिष्ठ म्हणजे याच्या उदघाटनाला कोणीही नेता अथवा मंत्री येत नाहीत. कारण अशा कुणी या बाजाराचे उद्घाटन केले तर त्याचे पद जाते असाही समज आहे.

या बाजारात राजस्थानबरोबरच यूपी, एमपी येथूनही गाढवे विक्रीसाठी आणली जातात व काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंतच्या राज्यातील ग्राहक गाढव खरेदीसाठी येथे येतात. या बाजारात फक्त गाढवे आणि खेचरे यांचीच खरेदी विक्री होते. ५०० वर्षांपूर्वी कछवाहांनी चद्रामीणा याचा एका युद्धात पराभव केला व हे यश साजरे करण्यासाठी येथे गाढवांचा बाजार भरविला गेला व तीच प्रथा अजून चालू असल्याचे सांगितले जाते. खालकानी मातेच्या मंदिराजवळच्या ५० एकर जागेत हा बाजार भरतो.

पूर्वी या बाजारात २५ हजारांहून अधिक गाढवे विक्रीसाठी येत असत आता मात्र हे प्रमाण रोडावले आहे. येथे मनोरंजनासाठी गाढव व घोड्यांच्या शर्यती होतात व अन्यही कार्यक्रम होतात. गाढवांना येथे साबण लावून अंघोळी घातल्या जातात तसेच त्यांच्या अंगावर विविध रंगांनी डिझाईन्स रेखली जातात. गाढवांना फुलांच्या माळा घातल्या जातात. काठेवाडी ब्रीडची गाढवे तसेच मजबूत समजली जाणारी मालाणी व संचोरी गाढवे यांना येथे खूप मागणी असते. त्यांच्या किमती ५०० रूपयांपासून २ हजार रूपयांपर्यंत असतात.

Leave a Comment