भारतात एटीएमच्या वाढीला ब्रेक


एटीएम म्हणजे ऑटो टेलर मशीन भारतात चांगलीच रूळली म्हणता म्हणता त्यांचा काळ व उपयुक्तता देशात उतरणीला लागल्याचे दिसून आले आहे. आपल्याकडे एटीएमला एनी टाईम मनी असेही चेष्टेने म्हटले जाते.पाहता पाहता ही एटीएम बँकींग क्षेत्राचा महत्त्वाचा हिस्सा बनली.२०१२ मध्ये देशात १ लाख एटीएम होती ती संख्या २०१५ मध्ये दोन लाखांवर गेली. पण आता मात्र त्यांच्या संख्येत वाढ होताना दिसत नाही. गेले सहा महिने एटीएमची संख्या होती तेवढीच राहिली आहे.

नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की देशात डेबिट कार्ड व्यवहार दर महिना ६६ कोटी होत होते तो आकडाही याच नंबरवर अडकला आहे. नोटबंदी पूर्वी या व्यवहारांचा आकडा होता ७५ कोटी. मात्र त्याचवेळी पॉईंट ऑफ सेल टर्मिनलची संख्या मात्र वेगाने वाढत चालली आहे. नोव्हेंबरमध्ये ही संख्या १५ लाख होती ती आता २७ लाखांवर गेली आहे. बिना कॅश पेमेंटमध्ये २०१२-१३ मोबाईल बँकींग चे प्रमाण ५.३ कोटी होते ते २०१५-१६ मध्ये ३९ कोटींवर गेले आहे. पेटीएमसारख्या मोबाईल वॉलेट युजरची संख्याही वाढती आहे याचा थेट परिणाम एटीएम व्यवहारांवर पडला असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. म्हणजे यापुढे भारतात एटीएमची संख्या वाढण्याची शक्यता अगदीच धुसर आहे.


एटीएमची सुरवात लंडनच्या बर्कले बँकेने केली व भारतात १९८७ ला एटीएम सुरू झाली.त्याचवेळी विदेशी बँकांनी भारतात ग्राहक आकर्षित करण्यासाठी एटीएमचा वापर वाढविला व त्याचा जोरदार प्रसार केला. त्यात एचडीएफसी, आयसीआयसीआय, अॅक्सिस बॅकांचा समावेश होता. त्यांना स्पर्धा करण्यासाठी सरकारी क्षेत्रातील बँकांनीही एटीएम सुविधा उपलब्ध केली. मोदी सरकारने त्याला प्रोत्साहन देताना देशातील सर्व कुटुंबांना जनधन योजनेखाली बँकातून खाती उघडून रूपे डेबिट कार्ड त्यांच्या हातात सोपविली त्यामुळे हा आकडा २०१२-१३ च्या ३१ कोटीवरून आता ५५ कोटींवर पोहोचला आहे. मात्र एटीएमच्या वाढीला आता ब्रेक लागल्याचेही दिसून येत आहे.

Leave a Comment