देशातल्या टॉप बॉडीबिल्डर महिला


स्वतंत्र भारतात आजही महिलांना अनेक बंधनांना सामोरे जावे लागत असले तरी अनेक क्षेत्रात महिलांनी पुरूषांच्या बरोबरीने कतृत्त्व गाजविले आहे. केवळ पुरूषांची मानल्या गेलेल्या अनेक क्षेत्रातही महिलांनी आपला वेगळा ठसा उमटवून दाखविला आहे. बॉडीबिल्डींग हे असेच खास पुरूषांचे मानले गेलेले क्षेत्र. मात्र यातही भारतीय महिलांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला डंका वाजविला आहे. त्यातील कांही जणींची ही ओळख.


मोनिका गुप्ता- जम्मूतील ४२ वर्षीय मोनिका दोन मुलांची आई आहे. तिला पाय व शरीरात फार वेदना होत असत. तसेच तिचे वजनही जास्त होते. घरात बसल्याबसल्या ती जिमचे व्हिडीओ पाहात असे व त्यातून तिने २०१४ मध्ये जिम जॉईन केली. तेथे वेट ट्रेनिंग करता करता तिने बॉडी बिल्डिंग करायला सुरवात केली व तीन वर्षनंतर स्पर्धेत भाग घेतला.वेट ट्रनिंगग करणारी जम्मूतील ती पहिला महिला ठरली. सुरवातीला शेजार्‍यांकडून त्यासंदर्भात टेामणेही ऐकावे लागले मात्र नंतर तिने स्टेट टूर्नामेंट जिंकली व तिच्याकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टीकोन बदलला. आपल्या या यशाचे सारे श्रेय तिने तिचा पती व मुलांना दिले आहे.


अंकिता सिंग- बॉडी बिल्डींगची आवड हिला पहिल्यापासूनच होती. ती आंतरराष्ट्रीय प्लेअर आहे व २०१४ पासून तिने आंतरराष्ट्रीय पातळीवर नांव कमावले आहे. बंगलोरला शिक्षण घेतलेल्या अंकिताचा ब्रेकअप झाल्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली होती.तेव्हा तिने जिम जॉईन केली तेथेच तिला बॉडी बिल्डींगची आवड निर्माण झाली. तिचे वडील राजकारणात आहेत व मुलीने असला बिकीनी घालावी लागेल असा खेळ खेळू नये असे त्यांचे म्हणणे होते मात्र तिच्या यशावर वडील आता खूष आहेत. ती एमएनसी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते.


भूमिका शर्मा – आईन सांगितले म्हणून अनेक वर्षे निशाणेबाजीवर लक्ष केंद्रीत केलेल्या भूमिकाला दुसर्‍याच कोणत्या खेळात करियर करायचे होते. तिचा पाहण्यात बॉडीबिल्डींगचा व्हिडीओ आला व हाच खेळ आपल्याला आवडतो हे तिचा लक्षात आले. उत्तराखंड मधील डेहराडून मध्ये राहणार्‍या भूमिकालाही सुरवातीला बॉडी बिल्डींग सुरू केल्यावर अनेक टोमणे ऐकावे लागले. पुरूषांसारखे मसल्स कसले दाखवायचे असेही ऐकावे लागले. मात्र भूमिकाची आई हंसा शर्मा या स्वतः भारतीय वेटलिफ्टींगच्या कोच असल्याने त्यांचा पाठींबा भूमिकाला मिळाला. भूमिका रोज २० किमी धावणे व अन्य व्यायाम करते. हेवी वेट ट्रनिंगगमुळे आत्मविश्वास वाढल्याचे सांगते. मिस वर्ल्ड बॉडी बिल्डींग चँपियनशीप तिने जिंकली आहे.


सोनाली स्वामी- भूतान एशियन चँपियनशीप जिंकलेली सोनाली ४२ वर्षांची असून तिला दोन मुले आहेत. फिटनेस कॅटेगरीत ब्राँझ पदकाची ती मानकरी ठरली. भारताची टॉप बॉडीबिल्डर असलेल्या सोनालीने हॉटेल मॅनेजमेंट मध्ये शिक्षण घेतले असून ती चांगली कथक डान्सरही आहे. चार वर्षांपूर्वी ती बॉडीबिल्डींग क्षेत्रात उतरली. याकामी तिला पतीचे पूर्ण सहकार्य मिळाले आहे. वर्ल्ड बॉडी बिल्डर चॅपियन टोप टेनमध्ये तिचा समावेश आहे. ती लष्करी अधिकार्‍याची कन्या आहे.


सरीता देवी- बॉक्सिंगमध्ये जागतिक कीर्ती मिळविलेल्या मेरी कोमच्या मणिपूरची सरीतादेवी हीनेही बॉडीबिल्डींग मध्ये चांगले नांव कमावले आहे.२०१० ला लग्न झाल्यानंतर या खेळाकडे ती वळली. तिलाही दोन मुले आहेत. विशेष म्हणजे घर व मुले सांभाळून सरितादेवी बॉडीबिल्डींग क्षेत्रात आपले नांव कोरते आहे.

Leave a Comment