पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घ्या…


पावसाळा आला की घाम येणे कमी होते पण आर्द्रता वाढल्याने वातावरण कुंद होते. या सर्वांचा परिणाम अर्थातच त्वचेवर होतो. त्यासाठी भारतीय मास्कचा वापरणे गरजेच आहे. पावसाळ्यातील हवामानबदल लक्षात घेता चेहऱ्याची काळजी घ्यायला हवी. यासाठी फेसमास्कचा वापर करायला हवा. योग्य फेसमास्क वापरल्यास पावसाळ्यामध्ये चेहऱ्यांचा रंग नक्कीच उजळेल.

* पुदीना आणि केळे यांच्यापासूनही मास्क तयार करता येतो. एक मुठ पुदीन्याची ताजी पाने घेऊन त्यात अर्धे केळे, एक चमचा दही आणि लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण एकत्र वाटून घट्ट लेप तयार करा. या लेप चेहऱ्याला लावून काही वेळ सुकु द्या. 10 मिनिटांनंतर गरम पाण्याने चेहरा धुवा. यामुळे चेहरा टवटवीत होतो. पावसाळ्यात चेहरा चांगला राहाण्यासाठी हा फेस मास्क अत्यंत उत्तम आहे.

* स्ट्रॉबेरी मास्क तेलकट किंवा सामान्य त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. 2 स्ट्रॉबेरी घेऊन त्या बारीक कापा त्यात एक चमचा ब्रॅंडी, दोन चमचे ब्रेड क्रम्प्स आणि दोन चमचे गुलाबपाणी घाला. हे सर्व एकत्र करून ते चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनंतर चेहरा चांगला धुवावा.

* एका वाटीत केळ्याचे दोन तुकडे, टरबूजाचे दोन तुकडे, सफरचंदाचे दोन तुकडे आणि एक स्ट्रॉबेरी चिरून एकत्र करा. हे वाटून लेप बनवा. त्यात दोन चमचे बेसन पीठ आणि एक चमचा दही घाला. हे सर्व एकत्र मिश्रण करा आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळ मसाज करा आणि तो सुकू द्या. हा फेस मास्क सर्व त्वचा प्रकारांसाठी उपयुक्त आहे.

* मुलतानी माती चा वापर केल्याने चेहऱ्यावरील धूळ, घाण स्वच्छ होते आणि त्वचेचा ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यासाठी 5-6 चमचे मुलतानी माती घेऊन त्यात गुलाबपाणी मिसळावे. हा मास्क चेहरा, मान यांच्यावर लावून तो सुकु द्या. ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी मात्र मुलतानी मातीचा लेप वापरू नये.

* ओटमील आणि अंडे यांच्यापासून बनवलेल्या मास्क चेहऱ्याच्या मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतो. त्यामुळे त्वचा ओलसर राहण्यास मदत होते. त्यामुळे पावसाळ्यात या मास्कचा वापर केल्यास त्वचा कोरडी पडणार नाही. दोन तीन चमचे ओटस घेऊन त्यात अंडे घाला. हे वाटून त्याचा मास्क तयार करून चेहऱ्याला लावा. काही वेळ तसाच ठेवून थंड पाण्याने धुवून घ्या.

* ज्यांच्या चेहऱ्यावर मुरुम किंवा पुटकुळ्या असतात त्यांच्यासाठी चंदनाचा मास्क सर्वोत्तम असतो. पाच सहा चमचे चंदनाची पावडर घेऊन त्यात दूध मिसळावे. गरज भासल्यास त्यात एक चमचा कोरफडीचे जेल आणि एक चमचा हळद घालावी. सर्व नीट मिसळून चेहऱ्यावर लावावे. पूर्ण सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा. पावसाळ्यातही त्वचा आरोग्यदायी तजेलदार रहावी यासाठी हा मास्क उपयुक्त आहे.

* बदामाचा मास्क सामान्य, तेलकट आणि रुक्ष त्वचेसाठी सर्वोत्तम विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत उपयुक्त ठरतो. वाढत्या वयाची लक्षणे दूर होतात. पावसाळ्यात घरच्या घरी बदामाचा फेसमास्क बनवण्यासाठी बदाम दूधात भिजत टाकावे. त्यानंतर ते वाटून घ्यावे त्यात मध घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. वीस मिनिट तसेच ठेवा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा जेणेकरून चेहऱ्यावर मास्कचा परिणाम दिसून येतो.

* केळ्यापासून तयार केलेला मास्क वापरल्यास त्वचा ओलसर राहते तसेच त्वचा मऊ आणि तजेलदार होते. अर्ध केळे कुस्करून घेऊन त्यात थोडे मध आणि लिंबू टाका. हे सर्व एकत्र करून चेहऱ्यावर लावा काही वेळ मसाज करा. मग पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा धुवावा. सर्वच प्रकारच्या त्वचेसाठी हा मास्क उपयुक्त आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment