“गो ग्रीन” गणेशोत्सव साजरा करून पर्यावरणाचे संवर्धन करा


आता गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. रस्त्यांवर, अगदी लहान लहान गल्ल्यांमध्ये देखील लहान मोठे मांडव घालण्यात येत असून गणपती बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. गणपती चे दहा दिवस तर मोठ्या आनंदात जातात, अनंत चतुर्दशीची मिरवणूकाही मोठ्या जल्लोषात पार पडते. पण नंतर मागे उरतात त्या नदीच्या किंवा तलावाच्या पाण्यामध्ये अर्धवट तरंगणाऱ्या भग्न गणेश मूर्ती. ज्या गणपती बाप्पाला इतक्या मानाने आपण वाजत गाजत घरी आणले, ज्याला जितक्या प्रेमाने, ढोल ताशांच्या गजरात निरोप दिला, त्याच गणपती बाप्पांच्या मूर्ती पाण्यात अर्धवट तरंगतानाचे दृश्य उदास करून जाणारे असते. पर्यावरणासाठी देखील हे धोकादायक आहे. हे लक्षात घेऊनच, मागील काही वर्षांपासून स्थानिक प्रशासनाद्वारे, पर्यावरणाच्या रक्षणावर भर देणाऱ्या आणि त्या साठी काम करण्याऱ्या संस्थांच्या द्वारे नागरिकांना खास गणेश विसर्जनाकरिता जागोजागी तयार करण्यात येत असलेल्या तळ्यांमध्ये गणपती विसर्जित करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. नागरिकही या बाबतीत आता अधिक जागरुक असल्याचे दिसून येत आहे.

याही पुढे जाऊन नेरळ येथील निलेश तुपे यांनी गायीच्या शेणापासून गणपतींच्या मूर्ती तयार केल्या आहेत. या मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केल्यानंतर ते पाणी झाडांसाठी खत म्हणून वापरता येणार आहे. या गणपतींच्या मूर्ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे गायीचे शेण राजस्थानमधील गोशालांधून मागविण्यात आले आहे. निलेश यांनी काही आठवड्यांपूर्वीच या गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. एरव्ही मूर्ती बनविण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरीस, आणि इतरही प्रदूषण वाढविणारे पदार्थ वापरले जातात. पण आता नागरिक या बद्दल सजग असल्याचे समाधान तुपे यांनी व्यक्त केले.

निलेश नेरळमधील त्यांच्या घरातूनच या गणेश प्रतिमांची विक्री करतात. या मूर्ती निरनिराळ्या साईझमध्ये उपलब्ध आहेत. सगळ्यात कमी किमतीची मूर्ती १०१ रुपयांना तर मोठ्या मूर्तींची किंमत साधारण २२०० रुपयांपर्यंत आहे. निलेश यांनी बनविलेल्या गणेशमूर्ती लोकांच्या पसंतीस उतरत असून आतापर्यंत जवळ जवळ दहा हजार मूर्ती संपूर्ण महाराष्ट्रभरात विकल्या गेल्या आहेत. या मूर्तींचे साधेपण आणि त्या तयार करण्यामागचा उद्देश लक्षात घेऊन नागरिकही या मूर्तींच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत.

Leave a Comment