येथे घरोघरी जन्मलेत सैनिक


उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यात आशियातील सर्वात मोठे गांव म्हणून गहमर ओळखले जाते. या गावाची लोकसंख्या आहे १ लाख २० हजार पण त्यापेक्षाही या गावाचे वैशिष्ठ म्हणजे या गावातून १० हजार सैनिक भारतीय लष्करात कार्यरत आहेत. त्यात साध्या सैनिकापासून ते कर्नल पर्यंत सार्‍यांचा समावेश आहे. म्हणजेच येथे घराघरातून सैनिकांनी जन्म घेतला आहे.

१५ किमीच्या परिसरात हे गांव पसरलेले असून येथे १० हजार घरे आहेत. या गावात आजी सैनिकांप्रमाणे १४ हजार माजी सैनिकही आहेत. गाजीपूरपासून ४० किमी असलेल्या या गावाला रेल्वे स्टेशन आहे. इतिहास सांगतो या गावात २२ टोले किंवा नाके असून प्रत्येक टोलाला कुणा ना कुणा प्रसिद्ध सैनिकाचे नांव दिलेले आहे. १५३० साली कुसमदेव राव यांनी सकरा डिह नावाच्या जागेवर हे गांव वसल्याचे सांगितले जाते.

पहिले, दुसरे महायुद्ध, १९६५ व १९७१ जी युद्धे तसेच कारगिल युद्धात या गावचे सैनिक सहभागी होते. पहिल्या महायुद्दात ब्रिटीशांकडून या गावातील २२८ सैनिक लढले होते व त्यातील २१ शहीद झाले होते. त्यासंदर्भातला शिलालेख येथे पाहता येतो. माजी सैनिकांनी येथे पूर्व सैनिक सेवा समिती संस्था स्थापन केली आहे व गंगातटावर येथील युवक मठिया चौकात सेनेत जाण्याची तयारी करताना दिसतात. या गावातून मोठ्या प्रमाणावर होणारी लष्कर भरती लक्षात घेऊन लष्कराचे भरती शिबिर येथेच घेतले जात असे मात्र १९८६ पासून ते बंद झाले आहे.

Leave a Comment