जगामधील या जागांना भेट देणे चक्क बेकायदेशीर


आताशा जगप्रवासाला निघालेली पुष्कळ मंडळी आपण पहात असतो. भारत, आशिया, अमेरिका, युरोप अश्या किती तरी ठिकाणी अतिशय सुंदर पर्यटनस्थळे आहेत. मात्र आपल्या जगामध्ये काही ठिकाणे अशी आहेत जिथे जाणे बेकायदेशीर आहे. जर अनाहूतपणे कोणीही या जागांना भेट द्यायचे ठरविले तर तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते. काही ठिकाणे तर अशी आहेत की तिथे गेल्यानंतर काही व्यक्तींना आपले प्राण देखील गमवावे लागले. अश्या या अजब जागा कुठल्या ते पाहूया.

१. बोहेमियन ग्रोव : मॉन्टे रिओ, कॅलिफोर्निया येथील हे स्थळ. आता या ठिकाणी जाणे बेकायदेशीर का? तर जगातील अतिशय गडगंज श्रीमंत लोकांचे हे विरंगुळ्याचे ठिकाण. येथे त्यांच्या ऐषारामी पार्ट्या चालत असतात. आमंत्रणाशिवाय येथे प्रवेश मिळत नाही. आणि जर कोणी आमंत्रणाशिवाय प्रवेश मिळविण्यात यशस्वी झालाच तर त्याची रवानगी सरळ पोलिस कोठडीत केली जाते.

२. लास्कॉ गुंफा : फ्रान्समधील लास्कॉ येथे प्राचीन युगातील गुहा असून या गुहा, त्यांमधील भित्ती-चित्रांकारिता अतिशय प्रसिद्ध आहेत. मात्र १९६३ सालापासून या गुहांमध्ये प्रवेश करणे कायद्याने मना करण्यात आले आहे. पर्यटकांनी येथील भित्ती चित्रांची नासधूस करू नये या साठी फ्रेंच सरकारला हा निर्णय घेणे भाग पडले. काही पर्यटकांनी येथील भित्ती चित्रांवर काही तरी चितारण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून आता पर्यटकांना या गुहे मध्ये प्रवेश करणे कायद्याने मना आहे.

३. सर्टसी ( आईसलंड मधील एक बेट ) : समुद्राच्या तळाशी झालेल्या भूकंपामुळे जो लाव्हा बाहेर पडला त्या लाव्हा मुळे १९६० च्या दशकामध्ये या बेटाचे निर्माण झाले. येथे प्रवेश करण्यास आम जनतेला परावानगी नाही. हे बेट अगदी अलीकडच्या काळात निर्माण झाल्यामुळे या बेटावर जीवसृष्टी हळू हळू विकसित होते आहे. हया विकसनशील जीवसृष्टीचा अभ्यास शास्त्रज्ञ करीत असल्यामुळे, केवळ त्यांनाच या बेटावर जाण्यास परवानगी आहे.

४. नॉर्थ सेन्टीनेल आयलंड : अंदमान द्वीपसमूहा मधील हे एक बेट आहे. या आयलंड वर जाणे म्हणजे स्वतःचा मृत्यू ओढवून घेण्यासारखेच आहे. या बेटावर वास्तव्य करणाऱ्या आदिवासींना त्याच्या बेटावर बाहेरून कोणी आल्यास ते रुचत नाही. त्यामुळे एखादा आगंतुक जर चुकूनमाकून या बेटावर आलच तर त्याचे स्वागत बाणांच्या वर्षावाने केले जाते.

५. निहाऊ ( हवाई ) : हवाई मधील द्वीपांपैकी हे एक अतिशय सुंदर द्वीप आहे. पण आम पर्यटकांना येथे जाण्यास कायद्याने मनाई आहे. याचे कारण असे की हे द्वीप रॉबिन्सन नामक परिवाराची खासगी मालमत्ता आहे. त्यामुळे खुद्द रॉबिन्सन परिवाराकडून आमंत्रण असल्याशिवाय ह्या बेटावर प्रवेश करता येत नाही.

६. व्हाइट्स जेन्टलमेन्स क्लब : लंडन, इंग्लंड येथे असणारा हा क्लब केवळ पुरुषांसाठी आहे. महिलांना येथे प्रवेश नाही. अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या क्लब मध्ये केवळ ३५ सभासद आहेत. या क्लबमध्ये सर्वांना प्रवेश नाही. जर एखाद्याला या क्लब चे सभासद व्हायचे असेल तर ते सभासदत्व, क्लब च्या उर्वरित सभासदांना कुठलीही हरकत नसल्यासच दिले जाते.

७. पोवेग्लिया : पोवेग्लियाचे छोटेसे बेट इटलीमधील लिडो आणि व्हेनिस च्या मध्ये आहे. इथे प्रवेश करण्यास इटालियन सरकारने बंदी घातली आहे. यामागचे कारण मोठे विचित्र आहे. काही वर्षांपूर्वी पोवेग्लिया येथे एक मनोरुग्णालय होते. या मनोरूग्णालयामध्ये राहणाऱ्या रुग्णांवर अनेक अत्याचार केले जात असत. तसेच त्यांच्यावर निरनिराळे प्रयोगही केले जात असत. या प्रयोगांमुळे अनेक रुग्णांचे प्राण गेले. असे म्हटले जाते की या अकाली मृत्यू झालेल्या रुग्णांचे अस्तित्व आज ही तिथे जाणवते. तसे विचित्र अनुभव अनेक पर्यटकांना तिथे गेल्यावर आले. त्यामुळे तेथील स्थानिक अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी येण्यासाठी कायद्याने बंदी केली आहे.

Leave a Comment