जागतिक वारसा यादीतील कांही सुंदर शहरे


युनेस्को तर्फे आत्तापर्यंत जगातील २८७ शहरांना जागातिक वारसा शहरे म्हणून जाहीर केले गेले आहे. आपल्या भारतातील अहमदबाद शहराला हा दर्जा यंदा मिळाला व भारतातील ते पहिले जागतिक वारसा शहर बनले. या यादीतील कांही सुंदर शहरांची माहिती आपण आज येथे घेत आहोत.


लेक डिस्ट्रीक्ट, युके-इंग्लंडच्या विंडरमरे भागातील हे गांव. कवी वर्ल्डस्वर्थचे हे गांव. तेथे त्याचे पहिले घरही आहे. देशातील सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर येथे असून या सरोवराची लांबी आहे १० मैल. १९ व्या शतकात येथे प्रथम रेल्वे पोहोचली आणि या सुंदर शहराला भेट देणार्‍या पर्यटकांची संख्याही तेव्हापासून वाढू लागली.विशेषतः उन्हाळी पर्यटनासाठी हा भाग प्रसिद्ध असून या सरोवरात १८ लहानमोठी बेटे आहेत. विलियम वर्डस्वर्थ हा कवी येथे १७९९ सालात राहात होता. आता त्याच्या घराचा कारभार ट्रस्ट कडून चालविला जात असून या घरातच वर्डस्वर्थच्या वापरातील वस्तू पहायला मिळतात. शिवाय स्टीमबोट म्युझियम, बिट्रीक्स पोटर, ग्रेट लँगडेल ही येथली कांही प्रेक्षणीय स्थळे आहेत.


अफ्रोडिसियस तुर्कस्तान- ही प्राचीन ग्रीक सिटी जगातील चांगल्या पुरातन साईटपैकी एक मानली जाते. अफ्रोडिसियस म्हणजे प्रेमाची देवता. यालाच रोमन लोक व्हिनस म्हणतात. ८ बीसी मध्ये हे शहर गॉडेस ऑफ लव्ह नावाने ओळखले जात होते. येथे त्या काळच्या मंदिरांचे कांही अवशेष पाहायला मिळतात. त्याकाळी येथे शिल्पकलेचे स्कूलही होते. ३ सेंच्युरी बीसी संबंधित काही प्राचीन शिल्पे आजही भग्न स्वरूपात येथे आढळतात तसेच त्या काळात बांधलेले सुमारे ३० हजार प्रेक्षक बसू शकतील असे स्टेडियमही येथे आहे.


इज्द, इराण- इराण मधील हे सुंदर वाळवंटी शहर प्राचीन ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. इराणला भेट देणार्‍या पर्यटकांनी यात्रा या शहराला भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नाही असे म्हटले तरी ते वावगे ठरू नये. शहराच्या मध्यावर असलेले आमीर चखमक कॉम्पेक्सचे सौंदर्य सूर्यास्तानंतर असे कांही रूप दाखविते की त्यावरून नजर हटविणे अवघड. १४ व्या शतकातील जामा मस्जीदही पाहण्याजोगी. या मशीदीचे मीनार देशात सर्वात उंच मीनार आहे. इराणी इस्लामी वास्तूशिल्पाचा उत्तम नमुना असलेल्या या ठिकाणी ब्ल्यू मोझॅक टाईल्सचे काम अप्रतिम. येथून जवळ असलेले खारानाक हे गांवही भेट द्यावी असे. येथे प्राचीन अवशेष आहेत व हे गांव १ हजार वर्षांपूर्वीचे आहे.


टेंपल संबोर प्रेइ कुक- कंबोडिया म्हटले की प्रथम आठवते ते अंकोर वट हे विष्णुचे अ्रतिप्राचीन मंदिर समुह असलेले ठिकाण. मात्र आता कंबोडियाची आणखीही एक ओळख समोर आली आहे. १६ व्या १७ व्या शतकातील फॉरेस्ट टेंपल सं बोर प्रेई कुक च्या निमित्ताने. हा अनेक मंदिरांचा समुह असून येथे लहान मोठी १४० मंदिरे आहेत. त्यातील कांही अष्टकोनी असून ती सातव्या शतकातली असल्याचे सांगितले जाते. ही मंदिरे राजा इशानवर्मन याच्या काळात बांधली गेली असावीत असा पुरातत्त्व तज्ञांचा अंदाज आहे.

Leave a Comment