श्रीकृष्णाने येथेच पिकविले होते मोती


कृष्णजन्माचा व त्यापाठोपाठ दहीहंडीचा सोहळा देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला. कृष्णाच्या अनेक लिला आपण कृष्णचरित्रातून ऐकतो व त्याचे पुरावे आजही अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. मथुरेजवळच्या नंदगांव व बरसाना गावांनाही कृष्णलिलाच्या कथांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे व ही गांवे भाविकांसाठी मोठ्या श्रद्धेचे स्थान बनली आहेत. या गावातच कृष्णाने मोती पेरून ते पिकविले होते अ्रशी कथा सांगितली जाते. आजही मोती कुंडाजवळ असलेल्या झाडांना मोत्याप्रमाणे फळे येतात व भाविक ही फळे मोठ्या भक्तीभावाने घरी नेतात. यामुळे घरादारात समृद्धी नांदते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या मागची कथा अशी सांगतात की गोवर्धन पर्वत उचलून कृष्णाने गावकर्‍यांचे रक्षण केल्यानंतर राधेच्या वडीलांनी नंदबाबाला महागडे मोती भेट म्हणून दिले. इतके किमती मोती सांभाळायचे कसे असा प्रश्न नंदाला पडला तेव्हा कृष्णाने यशोदामातेकडून हट्टाने हे मोती मागून नेले व ते कुंडाशेजारी जमितीन पेरले. नंदबाबाला हे कळले तेव्हा त्याने त्वरीत नोकरांना ते मोती जमिनीतून काढून आणण्याची आज्ञा केली. मात्र तेथे गेल्यावर असे दिसले की मोत्यातून झाडे आली होती व झाडांवर मोती लगडले होते. असे बैलगाडीभर मोती नोकरांनी घरी आणले तेव्हापासून त्या कुंडाला मोती कुंड असे नांव पडले.

या प्रकारची झाडे वृंदावनात अन्यत्रही आढळतात मात्र मोती कुंडाजवळील झाडांनाच फक्त मोत्यासारखी दिसणारी फळे येतात. भाविक येथे आवर्जून भेट देतात व ही फळे मोती समजून घरी नेतात.

Leave a Comment