स्वतंत्र भारताचे प्रतीक: खादी


आपल्या जगामध्ये असे अनेक देश आहेत ज्यांना परकीय शासनापासून स्वातंत्र्य मिळविण्याकरिता झगडावे लागले, अनेक प्राणांच्या आहुती द्याव्या लागल्या. आपल्या भारतामध्ये सुद्धा जेव्हा ब्रिटीश हुकुमतीविरुद्ध बंड पुकारले गेले तेव्हा ही चळवळ पुढे नेण्याचे अनेक मार्ग अवलंबले गेले. यातील मुख्य चळवळ होती ती म्हणजे ‘स्वदेशी’च. याच चळवळीचे आणि आज ही आपल्या देशाचे प्रतीक समजले जाणारे ‘खादी’ हे भारतीय वस्त्रपरिधान परंपरेचा मुख्य भाग आहे.

‘खादी’ हा शब्द ‘खद्दर’ या शब्दापासून आला. हाताने मागावर विणलेल्या कपड्याला खद्दर म्हणत असत. हे कापड तेव्हा भारत, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये वापरले जात असे. खादीच्या कपड्याचे निर्माण फक्त सूत वापरूनच नाही, तर लोकर आणि सिल्क वापरूनही केले जाते. यालाच खादी सिल्क आणि खादी वूल असे म्हटले जाते.

चरखा चालविणे आणि हातमागावर कपडा विणणे या कला भारतमध्ये अनेक दशकांपासून प्रचलित होत्या. पुरातन संस्कृती दर्शविणाऱ्या अवशेषांमध्ये देखील कपडे विणण्याकरिता वापरली जात असणारी, मातीची किंवा हाडांच्या मदतीने तयार केली गेलेली उपकरणे, उत्खननाच्या वेळी पुरातज्ञांना सापडली आहेत. ‘इंडस व्हॅली’ संस्कृती ज्या काळी अस्तित्वात होती त्या काळी देखील कपडे विणण्याची परंपरा अस्तित्वात होती असे सांगितले जाते.

भारतामध्ये सुती कपडा पुरातन काळापासून प्रचलित होता याचा उल्लेख पुरातन लेखांमध्ये ही सापडतो. ग्रीक इतिहासकार हेरोडोटस याने लिहून ठेवले आहे, ‘ भारतमध्ये अशी झाडे आहेत ज्यांच्यावर मेंढीच्या लोकरीसारखीच दिसणारी लोकर (कापूस) तयार होते. पण ही लोकर मेंढीच्या लोकरीपासून वेगळी असून अधिक मुलायम आणि उत्तम प्रतीची आहे. भारतामध्ये या झाडावरील लोकरीचा वापर करून कपडा तयार केला जातो.’

जेव्हा अलेक्झॅन्डर आपल्या सैन्यासह भारतामध्ये आपले राज्य उभे करण्याच्या उद्देशाने आला, तेव्हा कालांतराने त्याच्या सैनिकांनीही सुती वस्त्रे परिधान करायला सुरुवात केल्याचे म्हटले जाते, कारण इथल्या कडक उन्हाळ्यामध्ये सुती कपडा हा जास्त नरम, वापरायला सोपा आणि हलका असल्याचे त्यांच्या लक्षात आले. विशेष म्हणजे ५व्या शतकामधील अजंता येथील गुहांमधील काही चित्रांमध्ये कापसातून सरकी काढण्याचे काम सुरु असलेले आणि स्त्रिया चातीवर सूत कातत असल्याचे दर्शविले गेले आहे. म्हणजेच भारतामध्ये सुती कपडा वापरण्याची रीत त्या काळापासून प्रचलित होती असे म्हणायला हरकत नाही.

जेव्हा पोर्तुगीज भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी कॅलिको आणि चिंत्झ ह्या दोन कापडांची जगाशी ओळख करून दिली. सुरुवातीला हे कापडे फक्त पडदे किंवा पलंगपोस बनविण्याच्या कामी येत असत, पण त्या कापडांचा टिकाऊपणा, त्यांची कमी किंमत आणि त्यावर करता येत असलेली रंगेबिरंगी छपाई, या मुळे ही कापडे देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूपच लोकप्रिय झाली. त्यामुळे युरोपमधील स्थानिक गिरण्यांमध्ये तयार होत असलेल्या कपड्याची मागणी खूपच कमी झाली. म्हणून भारतामधून येत असलेल्या कॅलिको आणि चिंत्झ या कापडांवर युरोपियानांनी बंदी तर घातलीच, पण त्याशिवाय त्यांच्या कडे तयार होत असलेली कापडे त्यांनी भारतीय बाजारपेठांमध्ये पाठविण्यास सुरुवात केली. जसजसा हा परदेशी कपडा बाजारात येऊ लागला तसतशी सुती कपड्याची मागणी कमी होऊ लागली. शेकडो विणकरी आपला रोजगार गमावून बसले. पण या बिकट प्रश्नातून वाट काढली ती महात्मा गांधींनी. स्वतः चातीवर सूत कातून आणि सुती कपड्याचा स्वीकार करून महात्मा गांधींनी या एतद्देशीय कपड्याला पुनर्जीवन दिले. परकीय प्रांतांमधून आलेल्या कपड्यावर किंवा इतर वस्तूंवर बहिष्कार घालून स्वदेशी वस्तूंकडे वळावे या गांधीजींच्या आग्रहामुळे प्रेरित होऊन लाखो लोकांनी पुनश्च खादीचा स्वीकार केला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय सरकार ने अखिल भारतीय खादी ग्रामोद्योग बोर्ड ची स्थापना केली. तेव्हापासूनच खादी ग्रामोद्योग संपूर्ण भारतभरात खादी निर्मितीच्या व्यवसायास प्रोत्साहन देत आहे. यामध्ये खादी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, किंवा माग पुरविणे, कापड उत्पादनामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्याबाबतीत खादीचे उत्पादन करणाऱ्यांना मार्गदर्शन करणे असे विविध उपक्रम सुरु असतात. भारताप्रमाणेच आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खादीला चांगली मागणी आहे. जॅकेट, साडी, कुर्त्यापासून ते अगदी लेहेंगा – चोली, ड्रेसेस पर्यंत, सगळ्याच अवतारांमध्ये खादी आता लोकांच्या पसंतीला उतरू लागली आहे.

Leave a Comment