बेंगळूरू येथील हे मंदिर आहे ‘झीरो वेस्ट’ तत्वाचे पुरस्कर्ते


बेंगळूरू येथील श्री शक्ती कल्याण महागणपती मंदिराने आपल्या मंदिराच्या परिसरातील केर कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी काही नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरु केली आहे. ह्या नियामांच्या मुळेच दररोज अनेक भाविक येत असूनही ह्या मंदिराचा परिसर ‘ झीरो वेस्ट ‘ , म्हणजेच कचरा विरहित ठेवण्यात मंदिराच्या कारभाऱ्यांना यश आले आहे. आजकाल सगळीकडेच, साठत जाणऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहे. पण बेंगळूरू येथील महागणपती मंदिराच्या कारभाऱ्यांनी कचरा निर्मूलन करण्यासाठी एक उत्तम पर्याय शोधून काढला आहे. ह्या पर्यायाची अंमलबजावणी २०१६ च्या जून महिन्यापासून सुरु झाली आहे.

या मंदिरामध्ये दररोज साधारण ५०० भाविक येतात. या भाविकांनी आणलेली फुले इत्यादी निर्माल्य, प्लास्टिक च्या पिशव्या वगैरेंची, ओला आणि सुका कचरा अशी विभागणी होते. सुका कचरा महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी घेऊन जातात, तर ओल्या कचऱ्याचे कॉम्पोस्टमध्ये रुपांतर केले जाते. हे कॉम्पोस्ट मंदिराच्या आवारातील झाडांसाठी वापरले जाते.

या शिवाय या मंदिरामध्ये अजून एका नियमाचे आवर्जून पालन केले जाते. इथे प्रसाद देण्यासाठी प्लास्टिक च्या पिशव्या किंवा प्लास्टिक च्या वाट्या यांचा वापर अजिबात केला जात नाही. ज्या भाविकांना प्रसाद घरी नेण्यासाठी हवा असेल त्यांनी घरून येतानाच आपल्याबरोबर एक छोटा डबा आणावा असा आग्रह असतो. सुरुवातीला काही भाविक या धोरणामुळे नाराज ही झाले, पण कालांतराने हा नियम सर्वांच्याच अंगवळणी पडून गेला.

दर शनिवारी या मंदिरामध्ये अन्नछत्र चालविले जाते. जवळ जवळ सहाशे ते सातशे भाविक या अन्नछत्रामध्ये येतात. त्यावेळी भाविकांना जेवण वाढण्यासाठी प्लास्टिक किंवा थर्माकोल च्या प्लेट न वापरता मेलामाईन च्या प्लेट वापरल्या जातात. या प्लेट धुतल्यानंतर स्वच्छ होत असल्याने पुन्हा पुन्हा वापरता येतात. पण या कामी जास्त पाण्याची नासाडी होऊ नये याचीही खबरदारी घेतली जाते.

Leave a Comment