समाजवादी अवगुण


एक काळ असा होता की लालूप्रसाद, नितीशकुमार, रामविलास पासवान, शरद यादव, मुलायमसिंग हे एकाच पक्षात होते पण ते जनता पार्टीत आणि नंतरच्या जनता दलात एकत्र होते तरी त्यांनी आपला मुळातला समाजवादी गुण काही सोडलेला नव्हता. अहंंकारासाठी भांडणे आणि पक्ष फोडणे यात समाजवादी नेहमीच पुढे असतात. आता हे सारे नेते एकमेकांपासून दूर तर गेले आहेतच पण त्यांनी आपापल्या पक्षांच्या राहुट्या ठोकून मोठे तत्त्वाचे राजकारण करीत असल्याचा आव आणायला सुरूवात केली आहे. शरद यादव, नितीशकुमार आणि जॉर्ज फर्नांडिस आणि शरद यादव हे समता पार्टी नावाच्या पक्षात एकत्र होते. त्यांनी भाजपाशी युती केली होती आणि हे तिघेही वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळात होेते.

हे सरकार सत्तेवरून जाताच शरद यादव आणि नितीशकुमार यांनी फर्नांडिस यांंना निवृत्त व्हायला भाग पाडले. आता या दोघांत पक्षाचा खरा नेता कोण यावर वाद सुरू झाला आहे कारण नितीशकुमार यांनी भाजपाशी केलेली युती शरद यादव यांना मान्य नाही. आता या दोघांत त्यांचा जनता दल (यू) हा पक्ष खरा कोणाचा यावरून वाद निर्माण झाला आहे. अशा भांडणातून तर्कशुद्ध असे काहीच निष्पन्न होत नाही. दोघेही परस्परांना पक्षातून काढून टाकतात आणि सारा पक्ष आपल्याच मागे आहे असा दावा करतात. शेवटी प्रकरण निवडणूक आयोगात किंवा न्यायालयात जाते आणि कोणा तरी एकाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह मिळते.

आताही तसेच होणार आहे पण आपण आपल्या पायावर असा धोंडा का पाडून घेत आहोत याचा ते कधीच विचार करीत नाहीत. खरे तर नितीशकुमार यांनी भाजपाशी युती केली आहे हे शरद यादव यांना न आवडण्याचे काय कारण आहे हे काही कळत नाही. त्यांना काही भाजपाचे वावडे नाही. ते भाजपाप्रणित एनडीए आघाडीचे एकेकाळी निमंत्रक होते. पण आता नितीशकुमार यांनी भाजपाशी हात मिळवणी करताच त्यांना तत्त्वांची आठवण व्हायला लागली आहे कारण मूळ प्रश्‍न तत्त्वाचा नसून अहंकाराचा आहे. शरद यादव यांनी राज्यसभेत भाजपावर तोंडसुख घेणारे भाषण केले आणि त्याच दिवशी नितीशकुमार यांनी भाजपाशी युती करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे शरद यादव यांची मोठी पंचाईत झाली. आता भाजपाशी युती मान्य करावी तर आपण तोेंडघशी पडू अशी भीती त्यांना वाटत आहे आणि एवढ्या मुद्दयावर मुद्यावरून त्यांनी जनता दल (यू) आपल्या ताब्यात घेण्याचा किंवा नवा पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

Leave a Comment