आतापर्यंत ९ कोटींहून अधिक पॅनकार्डची ‘आधार’शी झाली जुळवाजुळव


नवी दिल्ली – पॅनकार्ड हे आधारशी जोडणे आयकर खात्याने आयकर परताव्यासाठी बंधनकारक केले असून आता या निर्णयाचा परिणाम दिसून येत आहेत. आधार कार्डला देशातील ९.३ कोटींहून अधिक नागरिकांचे पॅनकार्ड हे जोडण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. देशातील ३० टक्के पॅनकार्डधारक जून व जुलै महिन्यादरम्यान आधार कार्डशी जोडण्यात आले आहेत.

५ ऑगस्ट ही अंतिम मुदत आयकर परताव्यासाठी होती. पॅन कार्ड हे आधारशी संलग्न करण्यासाठी प्रत्यक्ष कर प्रत्याभूत मंडळाने ३१ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. पॅनकार्ड हे आधार कार्डशी संलग्न न केल्यास आयकर परतावा दिला जाणार नसल्याचा इशारा आयकर विभागाने करदात्यांना दिला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेलेल्या करदात्यांना व ८० वर्षाहून अधिक वय असलेल्या करदात्यांना यामधून सुट देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान देशात ३० कोटी पॅनकार्ड धारक आहेत, तर ११५ कोटी नागरिकांना आधार कार्डधारक आहेत.