पनामा पेपर प्रकरणात अडकणार अमिताभ बच्चन !


नवी दिल्ली – पनामा प्रकरणात सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या विरोधात आयकर विभागाने आक्रमक भूमिका घेतली असून या प्रकरणातील पुरावे आणि माहिती गोळा करण्यासाठी आयकर विभागातील एक वरिष्ठ अधिकारी ब्रिटिश व्हर्जिन आयलंडला रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

मध्य अमेरिकेतील पनामा या कर नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील ‘मोझॅक फॉन्सेका’ या कायदा सल्लागार कंपनीची ११. ५ दशलक्ष गोपनीय कागदपत्रे उघड झाली होती. जगभरातील राजकारणी, उद्योगपती, व्यावसायिक, चित्रपट कलावंत, क्रीडापटूंनी मालमत्ता लपवण्यासाठी, कर चुकवण्यासाठी आणि अन्य लाभांसाठी पनामा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, जर्सी, बहामा आणि सेशेल्स बेट या देशांमध्ये बोगस कंपन्यांमार्फत पैसा गुंतवल्याचे यात समोर आले होते. भारतातील ५०० जणांची नावे यामध्ये होते. अमिताभ बच्चन यांच्यासह के. पी. सिंग, समीर गेहलोत यांच्यासारख्या दिग्गज लोकांचा यात समावेश होता. भारतातही नवाझ शरीफ यांच्यावरील कारवाईनंतर पनामा पेपरप्रकरणातील संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती.

या संदर्भातील वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार आयकर विभागाने पनामा पेपरप्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला आयकर विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, याप्रकरणात आम्ही दिरंगाईची भूमिका घेतली नाही. तपासाची चक्रे वेगाने फिरत असून अन्य देशांमधून माहिती गोळा करण्याचे काम सुरु आहे असे त्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Leave a Comment