चक्क कुत्रीच करत आहे मांजराचे संगोपन !


ठाणे – कोणत्या ना कोणत्या कारणाने माणूसच माणसाशीच हाडवैऱ्याप्रमाणे वागत असतो. पण उल्हासनगरमध्ये त्यांनी प्राण्यांकडून आदर्श घ्यावा, असे उदाहरण दिसून आले आहे. मांजर आणि कुत्रा हे निसर्गत: एकमेकांचे हाडवैरी असतात. पण उल्हासनगरातील एका रस्त्यावर एका भटकी कुत्री ही चक्क मांजराला दूध पाजून तिचे संगोपन करत आहे.

कुत्रा आणि मांजरातील उल्हासनगरातील कॅम्प (नं. ४) येथील सुभाष टेकडी परिसरातील आंबेडकर चौकात ‘ममत्वाचे नाते’ पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. हे दृश्य उल्हासनगरमधील एका चहाच्या दुकानाच्याठिकाणी पाहायला मिळत आहे. सुभाष टेकडी परिसरात तांबुस रंगाची मांजर आणि काळ्या रंगाची कुत्री हे मोकाटपणे एकत्र फिरतात. ती मांजर आणि कुत्री गेल्या ६ महिन्यांपासून एकत्रच फिरत असल्याने त्या दोघांमध्ये अतूट मैत्रीचे नाते निर्माण झाले आहे. ती मांजर सुरुवातीला त्या कुत्रीशी खेळताना तिला चावा घेण्यासाठी धावत असे. पण त्यानंतर ते दोघेही एकत्रच एका हातगाडीखाली बसू लागल्याने त्यांचे ते नेहमीचेच स्थान झाले आहे. कुत्री मांजर भुकेली असताना तिला जवळ घेत पिल्लांप्रमाणे दूध पाजते. ती मांजरदेखील बिनधास्त दूध पित असल्याचे दृश्य नागरिकांना पाहायला मिळत आहे. दिवसातून २ वेळा ती कुत्री त्या मांजरीला दूध पिण्यास देत आहे. नागरिकांनी मांजरीसाठी खाण्यासाठी टाकलेली बिस्कीट इत्यादी खाद्यपदार्थ मांजर हे त्या कुत्रीला आणून देते. त्या दोघांमध्ये असलेल्या मैत्रीचे, ममत्वाच्या भावनाचे नागरिक कौतूक करत आहेत.

Leave a Comment