चीनमध्ये सुरू झाली मायक्रो जिम सेवा


पाश्चिमात्य देशांची नक्कल करून चीन वेगाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे. देशभर विविध नवनवीन सेवा, व्यवसाय सुरू केले जात आहेत. त्यासाठी मोठी गुंतवणूकही मिळविली जात आहे. शेअर्ड बाइक्स, स्मार्ट करावके बुथ आता येथे जागोजाग दिसू लागले आहेत. बिजिंग येथे एका स्टार्टअप कंपनीने त्यापुढे जाऊन डिजिटल जिमपॉड उभारली आहेत. याचे विशेष म्हणजे येथे मिनिटांवर पैसे भरून येता जाता कधीही व्यायाम करता येतो.

अनेकांना प्रकृती चांगली ठेवण्याचे महत्त्व कळलेले असते मात्र इच्छा असूनही कामाच्या व्यापांमुळे ते व्यायामासाठी वेळ काढू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन ही जिम पॉड उभारली जात आहेत. यात जिम शोधणे व जिमपॉड मध्ये प्रवेश करणे ही कामे अॅपमुळे करता येतात. या छोटेखानी म्हणजे अवघ्या ४० चौरस फुटाच्या जिममध्ये ट्रेडमिल, एसी, एअर प्युरिफायर व टीव्हीची सुविधा दिली गेली आहे. सार्वजनिक टॉयलेट इतकाच या जिमचा आकार आहे. येथे निनिटाला दोन रूपये या दराने व्यायाम करता येतो.


मिसपाओ नावाच्या स्टार्टअपने ही सेवा सुरू केली आहे. यामुळे कार्यालयात जाताना, घरी परतताना कुणीही या जिमपॉडचा वापर करून व्यायाम करू शकतो व आपले आरेाग्य चांगले राखू शकतो. जिमपॉडच्या दरवाज्यावर क्यूआर कोड आहे तो स्कॅन करायचा व पैसे भरून आत प्रवेश करायचा. येथे छोट्या वर्कआऊट एक्सेसरीजही आहेत. वर्षअखेर या प्रकारच्या १ हजार जिमपॉड बिजिंगमध्ये उभारण्याची या कंपनीची योजना आहे. अर्थात या रस्त्यांवरच्या जिमची सुरक्षा तसेच कमी किमतीतली सेवा कशी परवडणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे मात्र त्यावरही उपाय शोधायचे प्रयत्न केले जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.