ट्रेकिंग करण्यासाठी कोणते शूज वापराल?


पावसाळा सुरु झाला की दर सुट्टीला कुठे तरी ट्रेक ला जाण्याच्या योजना आखल्या जात असतात. पण ट्रेकसाठी जाताना आपण वापरणार असलेले शूज जर आरामदायक नसतील तर लांब अंतरापर्यंत चालणे किंवा चढण चढणे त्रासाचे ठरू शकते. त्यामुळे ट्रेक साठी घालायचे शूज निवडताना काही गोष्टींचा विचार करायला हवा. सर्वप्रथम शूज कोणत्या मटेरियल चे बनले आहेत हे पाहून घ्यावे. जर भर पावसामध्ये ट्रेकिंग करणार असाल तर ‘goretex’ वापरून तयार केलेले शूज वापरा. goretex हे एक असे मटेरियल आहे ज्यामुळे तुमचे शूज बाहेरून जरी भिजले तरी तो ओलसरपणा शूज च्या आत येणार नाही आणि तुमचे पाय कोरडे राहतील.

पायाच्या तळव्याला व्यवस्थित आधार मिळेल असे शूज घालावे. विशेषतः पाठीवर जर जास्त वजन असलेले बॅकपॅक नेणार असाल, किंवा जर खूप अंतर किंवा चढ उतार असलेल्या वाटांवर चालणार असाल तर उत्तम सपोर्ट देणारे शूज महत्वाचे आहेत. शूज चे सोल किंवा तळ कसा असावा हे तुम्ही किती दूरवर ट्रेक ला जाणार आहात यावर अवलंबून असते. जर ट्रेक अगदी जवळचा असेल आणि रस्ता सरळ सोपा असेल तर लवचिक सोल असलेले शूज वापरा. मात्र जर ट्रेक लांबचा असेल आणि जास्त चढ उतार असतील किंवा जर खूप वजनाचे सामान बरोबर नेणार असाल तर जाड आणि मजबूत सोलचे शूज वापरणे चांगले. भारतामध्ये मेरील, हाय टेक, मॅड रॉक इत्यादी कंपन्यांचे खास ट्रेकिंग करिता बनविलेले शूज उपलब्ध आहेत.

जेव्हा खुद्द शूज निवडत असाल तेव्हा ट्रेकिंगसाठी किती वेळा जाणार, किती अंतर जाणार या वरून कश्या प्रकारचे शूज घ्यावे हे निश्चित करावे. हायकिंग सँडल्स या प्रकारामध्ये मोडणारे शूज पायाच्या तळव्याला फारसा आधार देणारे नसतात. त्यामुळे हे शूज फक्त थोड्या अंतरासाठी वापरणे चांगले. तासाभराच्या वर जर ट्रेक असेल तर हे शूज वापरू नयेत. हायकिंग शूज हे लाईटवेट फॅब्रिकचे बनलेले असून त्यांच्यामुळे पावलांना आणि टाचांना उत्तम आधार मिळतो. मध्यम चढ उतार असलेल्या वाटांवर ट्रेकिंग करण्यास या प्रकारचे शूज उत्तम. हायब्रीड बूट्स ह्या प्रकारात मोडणारे शूज लाईट वेट असून टाचांना उत्तम सपोर्ट देणारे असतात. अनेक दिवसांचा ट्रेक असेल तर हे शूज वापरावे. माउंटेनियरिंग बूट्स हे कडे कपाऱ्यांमध्ये ट्रेकिंग करणार असाल तरच घ्यावे. ओल्या, खडकाळ वाटांवर अनेक दिवसांचा ट्रेक असल्यास हे शूज उत्तम.

Leave a Comment