११ डिसेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन


मुंबई – शुक्रवारी मागील ३ आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले असून शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, समृद्धी महामार्ग अशा विविध प्रश्नाने हे अधिवेशन गाजले. एकूण २१ विधेयके या अधिवेशनात मांडण्यात आली होती. त्यापैकी दोन्ही सभागृहांनी मिळून ६ विधेयके संमत केली. पुढील हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू होईल.

पावसाळी अधिवेशनाची शुक्रवारी सांगता झाली. या अधिवेशनात ६ विधेयक संमत करण्यात आली. तसेच ९ हजार ९९९ एवढे तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यापैकी ९२३ प्रश्न स्वीकृत करण्यात आले. तर ४१ प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. त्याचबरोबर एकूण २ हजार ७८५ लक्षवेधी सूचना देण्यात आल्या. त्यापैकी १२९ सूचना स्वीकृत करण्यात आल्या. तर ४७ लक्षवेधी प्रश्नांवर सभागृहात चर्चा करण्यात आली.

या अधिवेशनात सभागृहाची सरासरी उपस्थिती ८१. ९९ टक्के होती. तर सर्वाधिक उपस्थिती ९२.६२ टक्के ऐवढी होती. सर्वात कमी उपास्थिती ६८.७५ टक्के होती. राज्यपालांच्या शिफारसीनुसार पुढील हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी यावेळी केली. या अधिवेशनात दररोज सरासरी ६ तास ५१ मिनिटे कामकाज चालले. राष्ट्रगीताने विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले.