‘या’ पठ्याने एकाच षटकात टिपले ६ बळी


तुम्ही आपल्या सिक्सर किंग युवराज सिंहला ६ चेंडुंवर ६ षटकार मारताना पाहिलेच असेल. त्याच्या कारनाम्याचा व्हिडीओ आज देखील सोशल मीडियात तेवढ्याच उत्साहाने पाहिला जसे त्यांनी हा विक्रम काल परवाच केला आहे. त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर काही वेळा ६ चेंडुंवर ६ चौकारही ठोकताना अनेक फलंदाजांना पाहिले असेल. पण लंडनमधील एका १३ वर्षाच्या गोलंदाजाने ६ चेंडुंमध्ये ६ फलंदाजांना माघारी धाडले आहे. या गोलंदाजाचे नाव ल्यूक रॉबिन्सन असे असून, ल्यूकने हा पराक्रम लंडनमधील १३ वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत केला आहे. विशेष म्हणजे ल्यूकने या सर्व फलंदाजांच्या दांड्या गुल म्हणजेच त्रिफळाचीत करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

फिलाडेल्फिया क्रिकेट क्लबकडून ल्यूक हा स्थानिक स्पर्धांमध्ये खेळतो. त्याचा हा अनोखा विक्रम पहायला त्याचा परिवार मैदानात हजर होता. या सामन्यात ल्यूकचे बाबा स्टिफन हे पंच म्हणून काम पाहत होते. तर त्याच्या या विक्रमाची नोंद करुन घेण्याचा मानही त्याची आई हेलन यांना मिळाला. कारण या सामन्यात त्याची आई ‘स्कोअरर’ म्हणून काम पाहत होती. तर ल्यूकचा भाऊ मॅथ्यू हा सामन्यात क्षेत्ररक्षण करत होता. त्यामुळे आपल्या परिवारातील सदस्याने केलेल्या विक्रमाचे साक्षीदार होण्याचे अनोखे भाग्य रॉबिन्सन परिवाराला मिळाले.