चांगली सुरुवात करूनही भारताची पडझड


नवी दिल्ली – श्रीलंकेच्या गोलंदाजांना तिसऱ्या कसोटीत अखेर सामन्यात भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात अखेर यश आलेले असून लंकेच्या गोलंदाजांनी दिवसाअखेरीस भारताचे ६ गडी माघारी धाडले आहेत. भारतीय डावाची चांगली सुरुवात झाल्यानंतर मलिंदा पुष्पकुमाराने लोकेश राहुलला माघारी धाडलं. त्यानंतर ठराविक अंतराने शतकवीर शिखर धवन आणि चेतेश्वर पुजाराला लागोपाठ माघारी धाडण्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना यश आले. शिखर धवन ११९ धावा काढून दिनेश चंडीमलच्या हाती झेल देत माघारी परतला. पाठोपाठ चेतेश्वर पुजाराही अवघ्या ८ धावांवर झेलबाद झाला.

कर्णधार विराट कोहलीने यानंतर अजिंक्य रहाणेच्या सोबतीने ३५ धावांची भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणे पुष्पकुमाराच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पाचव्या विकेटसाठी रविचंद्रन अश्विनसोबत पुन्हा एकदा ३२ धावांची भागीदारी केली. पण कोहली माघारी संदकनच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये करुणरत्नेच्या हाती झेल देत परतला. यानंतर रविचंद्रन अश्विनने वृद्धीमान साहाच्या मदतीने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. सहाव्या विकेटसाठी साहा आणि अश्विनने २६ धावांची छोटी भागीदारीही रचली. पण दिवसाचा खेळ संपाण्यास ३ षटके बाकी शिल्लक असताना विश्वा फर्नांडोने अश्विनला माघारी धाडत भारताला आणखी एक धक्का दिला. त्यामुळे पहिल्या दिवसाअखेरीस भारताची अवस्था ही ३२९/६ अशी झालेली आहे.