शरद यादवांची राज्यसभेतील सभागृह नेतेपदावरून हकालपट्टी


नवी दिल्ली – नितीश कुमार यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून जाहीरपणे टीका करणारे संयुक्त जनता दलाचे (जदयू) ज्येष्ठ नेते शरद यादव यांना अखेर पक्षाच्या कारवाईला सामोरे जावे लागले असून शनिवारी त्यांच्याकडून राज्यसभेतील पक्षनेतेपद जदयूने काढून घेतले आहे आणि आता त्यांच्याऐवजी रामचंद्र प्रसाद सिंग यांची पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. या वृत्ताला जदयूचे बिहार प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांनीही दुजोरा दिला आहे. शरद यादव यांनी गेल्या काही काळात केलेल्या पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करणे गरजेचे होते. त्यांना आम्ही पक्षातून काढून टाकलेले नाही. फक्त त्यांच्याऐवजी रामचंद्र प्रसाद सिंग यांची नियुक्ती केली आहे, असे स्पष्टीकरण रामचंद्र प्रसाद सिंग यांनी दिले. आज यासंदर्भात उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व्यंकय्या नायडू यांची जदयूच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याकडे लेखी विनंती अर्ज सादर केला.

दरम्यान, काल दिल्लीत नितीश कुमार यांची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भेट घेतली. त्यानंतर आज ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी या भेटीबद्दलची माहिती दिली. अमित शहा यांनी यावेळी नितीश यांच्या जनता दलाला (संयुक्त) भाजपप्रणित रालोआ आघाडीत सामील होण्याचे निमंत्रण दिले आहे.

पण आता जदयूमध्ये नितीश यांच्या या निर्णयानंतर उभी फूट पडण्याची शक्यता आहे. पक्षातील वरिष्ठ नेते शरद यादव नितीश यांच्या निर्णयावर सुरूवातीपासून नाराज आहेत. पण त्यांची समजूत काढण्याऐवजी, शरद यादव त्यांचा निर्णय घ्यायला मोकळे आहेत, अशी प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिली होती. भाजपसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच मी घेतला होता, शरद यादव यांना माझा निर्णय पटला नसेल तर त्यांनी खुशाल स्वतःचा मार्ग निवडावा त्यांना कोणीही थांबवणार नाही असेही नितीशकुमार यांनी सांगितले.