लोकमान्यांच्या फोटोवर पुणे महापौरांची सारवासारव


पुणे – लोकमान्य टिळक यांचा फोटो गणेशोत्सवाच्या लोगोतून गायब केल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी चौफेर टीका होताच आता सारवासारव सुरू केली आहे. टिळकांचा फोटो १२५ व्या पुणे गणेश उत्सवाच्या बोधचिन्हात टाकण्याचे कोणतेही नियोजन नव्हते, असा दावा महापौरांनी केला आहे.

या गणेशोत्सवादरम्यान, जाहिराती, आणि फ्लेक्सवर शिवाजी महाराज आणि लोकमान्यांचा फोटो झळकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असून लोकमान्य टिळकांचा फोटो महोत्सवाच्या लोगोमधून वगळणे, ही लोकमान्य टिळकांचीच अवहेलना असल्याची टीका भाऊ रंगारी ट्रस्टने केली आहे. भाऊ रंगारी यांना सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याचे श्रेय मिळू नये, यासाठीच महापौर मुक्ता टिळक अशा पद्धतीचे खालच्या पातळीवरचे राजकारण खेळत असल्याचा आरोपही ट्रस्टने केला आहे.

भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक पुण्यात सध्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक यावरून मोठा वाद सुरु आहे. शिवाय यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पण सार्वजनिक गणेशोत्सवाचे हे १२५ वे नाहीतर १२६ वे वर्ष असल्याचे म्हणत भाऊ रंगारी ट्रस्टने न्यायालयात धाव घेतली आहे. या वादात भर नको म्हणून महापालिकेच्या महोत्सवासाठी बनवलेल्या लोगोमधून टिळकांचा फोटो वगळ्याचा निर्णय महापौरांनी घेतला. पण त्यांच्या या कृतीने हा वाद कमी न होता उलट वाढलेला दिसतो आहे. दरम्यान, टिळक घराण्याचे वारसदार डॉ. दीपक टिळक यांनी हा वाद अकारण उकरुन काढला जात असल्याची खंत व्यक्त केली आहे.