मोदीजी, तुम्हाला गोरखपूर घटनेतील मृतांचे दुख: नाय काय!


नवी दिल्ली – आतापर्यंत ६३ मुलांचा मृत्यू उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी झाल्याच्या घटनेने देशभरात संताप व्यक्त करण्यात येत असतानाच विरोधक आणि नेटकऱ्यांनी या घटनेनंतर सोशल मीडियावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही काही यूजर्सने लक्ष्य केले आहे. देश-विदेशातील बारीक-सारीक घडामोडींवर ट्विट करून भाष्य करणारे पंतप्रधान मोदी या घटनेचे दुख: नाय काय? असा सवाल विचारला आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील भाजप सरकारला गोरखपूर रुग्णालयातील घटनेनंतर विरोधकांनी लक्ष्य केले आहे. राज्य सरकारच या घटनेला जबाबदार असून योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोशल मीडियाच्या माध्यमातून यूजर्सने निशाणा साधला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली. अशा स्वतंत्र भारतात अशा प्रकारे मुलांचा मृत्यू व्हावा ही दुःखद आणि लाजिरवाणी बाब असल्याचे काहींनी म्हटले आहे. एरव्ही बारीक-सारीक घटनांवर ट्विट करून लक्ष वेधून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेनंतरही अजून गप्प का, असा सवाल काहींनी विचारला आहे. गोरखपूर येथील घटनेवर मोदींनी किमान एक तरी ट्विट करावे.