भारताने डोकलाम सीमेवर वाढवली सैनिकांची संख्या


नवी दिल्ली – भारताला डोकलाममधून आधी सैन्य मागे घ्या अन्यथा युद्ध अटळ आहे, अशा धमक्या चीन काही दिवसांपासून देत आहे. भारताने अशातच सिक्कीम, अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर सैन्य वाढवल्यामुळे चीनच्या डोकेदुखीत आणखी वाढ होणार आहे.

युद्धाच्या चीन सतत वल्गना करत आहे. भारताने अशातच सिक्कीम ते अरुणाचल प्रदेशपर्यंत असलेल्या इंडो-चीनच्या १,४०० किलोमीटर लांब सीमेजवळील भागात सैन्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला. भारतीय लष्कराकडे कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी आवश्यक शस्त्रसामग्री आहे. कोणत्याही संकटाचा सामना करायला भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी दिली.

सीमेवर दिवसेंदिवस तणाव चीनच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे वाढत आहे. चीन डोकलामच्या सीमा प्रश्नावरुन आक्रमक भूमिका घेत आहे. सैन्य मागे घ्या नाहीतर १९६२ सारखी अवस्था करू, असे इशारे चीनकडून सतत देण्यात येत आहे. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, स्थानिक हवामान समन्वय प्रक्रिया पार केलेल्या सैनिकांसह सुमारे ४५ हजार अतिरिक्त सैनिक सीमेवर चौवीस तास तैनात असतात. पण अपरिहार्यपणे त्यांना तैनात करण्यात येणार नाही. समुद्र सपाटीपासून ९,००० फुटापेक्षाही जास्त उंचीवरील तापमानाशी जुळवून घेण्यासाठी १४ दिवसांचा अत्यंत कठीण सराव भारतीय जवानांना करावा लागतो. दरम्यान डोकलाम सीमेवर मागील ८ आठवड्यांपासून ३५० जवान तैनात आहेत, अशी माहिती संरक्षण तज्ज्ञांनी दिली.