‘वंदे मातरम्’ सक्तीला मनसेचा विरोध


मुंबई – शिवसेना-भाजपने संख्याबळाच्या आधारे महानगरपालिकेच्या सभागृहात शाळांमध्ये वंदे मातरम् सक्तीचे करण्याचा निर्णय मंजूर करून घेतल्याचा दावा करत समाजवादी पक्षाने महापालिका आयुक्तांकडे धाव घेतली आहे. मुस्लिम बांधवांनीही स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला होता पण धार्मिक भावना दुखावणारा हा निर्णय असल्याने या निर्णयाबाबत नकारात्मक व कायदेशीर निर्णय घेण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली आहे. त्याच वेळी मनसेने आधी शाळेतील शिक्षण सुधारा मग ‘वंदे मातरम्’ची सक्ती करा, असा पवित्रा घेतला आहे.

शाळांमध्ये वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती लागू न करण्याचा निर्णय १३ वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्तांनी घेतला होता. सपचे गटनेते रईस शेख यांनी त्याचा आधार घेत आयुक्तांना पत्र लिहिले आहे. वंदे मातरमच्या ठरावाच्या सूचनेवर गुरुवारी सभागृहात मतदान घेण्याची मागणी केली होती, पण या मागणीकडे महापौरांनी दुर्लक्ष करत निर्णय घेतला. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मुस्लीम बांधवांनी स्वातंत्र्यलढय़ात देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे. मात्र वंदन या शब्दाचा अर्थ पूजा असून मुस्लीम अल्लाव्यतिरिक्त कोणाचीही पूजा करत नसल्याने त्यांच्यावर वंदे मातरमची सक्ती नको, असे रईस शेख यांनी पत्रात लिहिले आहे.

दरम्यान या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विरोध केला आहे. वंदे मातरमबद्दल गंभीर असणारे शाळेबद्दल गंभीर नाहीत, असे मत मनसेचे नेता संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांचे टॅब बंद आहेत. दरवर्षी शाळेतील वस्तूंच्या खरेदीत घोटाळा होतो, शाळांची छप्परे गळतात, शिक्षणांचा दर्जा खालावतो आहे, मात्र याबद्दल सत्ताधाऱ्यांना काही वाटत नाही. त्यांना फक्त वंदे मातरम् सक्तीचे करण्यात रस आहे, असेही देशपांडे म्हणाले.