लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार


बीड : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार होत असून या रेल्वेमार्गाचे कामकाज सुरू झालेले असताना स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांचे नाव या रेल्वेमार्गाला द्यावे, असा ठराव बीड जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला.

या ठरावाला जिल्हा परिषदेच्या सर्वांनीच पाठिंबा देत तो पारित करण्यात आला. लवकरच अहमदनगर-बीड-परळी हा रेल्वेमार्ग दृष्टीक्षेपात येणार आहे. रेल्वे मार्गाचे काम प्रगती पथावर असून पहिल्या टप्प्यातील अहमदनगर ते नारायणडोह रेल्वेमार्ग जवळपास पूर्ण होत आला आहे. गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्हा रेल्वेच्या नकाशावर आणण्यासाठी अनेक वर्षे प्रयत्न केले. या मार्गाला मंजुरी मिळाली आणि कामही सुरु झाले. पण हा मार्ग त्यांच्या हयातीत प्रत्यक्षात येऊ शकला नाही. त्यामुळे या रेल्वमार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी बीड जिल्ह्यातून जोर धरत होती. अखेर जिल्हा परिषदेने त्याला एकमताने मंजुरी दिली.