Skip links

मेहता आणि देसाईंची लोकायुक्तांमार्फत होणार चौकशी


मुंबई : राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून या दोघांवर झालेल्या घोटाळ्यांच्या आरोपांची चौकशी विरोधकांच्या दबावानंतर लोकायुक्तांमार्फत केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केली.

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरील घोटाळ्याचा मुद्दा विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लावून धरला होता. पुन्हा एकदा राजीनाम्याची जोरदार मागणी केली. ‘एसआरए’ मधील अनेक प्रकल्पांचा डेव्हलपर ओम्‌कार बिल्डर हा सरकारचा जावई आहे का ? असा सवाल मुंडे यांनी विचारला. यासोबतच मेहता यांना पाठिशी घालणा-या मुख्यमंत्र्यांवरही मुंडे यांनी जोरदार टीका केली.

त्याचबरोबर गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेतांचा म्हाडा व एसआरए घोटाळा, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा एमआयडीसी जमीन घोटाळा, सभागृहात पुराव्यांसह मांडल्यानंतरही मंत्र्यांना पदावरुन हाकलणार नसाल तर, भ्रष्टाचाराला कायदेशीर मान्यता देऊन टाका, असा उपरोधिक टोला धनंजय मुंडे यांनी आज सरकारला लगावला.

Web Title: Lokayukta Probe Against Mehta and Desai