योगींच्या मतदारसंघात ६० बालक ऑक्सिजनअभावी दगावले


गोरखपूर- ऑक्सिजनचा पुरवठा बंद पडल्यामुळे ४८ तासांत २३ मुलांसह ३० रुग्णांचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ गारेखपूर येथील बाबा राघव दास (बीआरडी) वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला. ६९ लाख रुपयांचे बिल थकल्याच्या कारणावरून रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी गुजरातची कंपनी पुष्पा सेल्सने पुरवठा बंद केला होता. बुधवारी ऑक्सिजन टाकी रिकामी झाली. याच दिवशी सायंकाळी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली.

दोन वर्षांपूर्वी बीआरडी महाविद्यालयात द्रवरूप ऑक्सिजन प्रकल्प स्थापन केला. येथून १०० खाटांच्या इन्सेफेलायटिस वॉर्डसह ३०० रुग्णांना ऑक्सिजन दिला जातो. महाविद्यालय प्रशासनाने ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाल्यामुळे गोरखपूर औद्योगिक विकास प्राधिकरण (गीडा), सशस्त्र सीमा दल व खासगी रुग्णालयांची मदत मागितली होती. गुरुवारी दिवसभर ९० जंबो सिलिंडरद्वारे ऑक्सिजन पुरवला गेला. रात्री १ वाजता ही खेप संपली. यानंतर गोंधळ उडाला. ३.३० वाजता ५० सिलिंडर आले. रुग्णवाहिकेच्या मदतीने २ तास ऑक्सिजन देण्यात आले. यादरम्यान, एकापाठोपाठ एक ३० रुग्णांनी प्राण सोडले.

वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी या संकटात बरीच पळापळ केली. रात्री २.०० वाजता इन्सेफेलायटिस वॉर्डाचे प्रभारी डॉ. कफील खान रुग्णालयात आले. सकाळी ७.०० वाजेपर्यंत अधिकारी, ऑक्सिजन पुरवठादारने फोन न उचलल्यामुळे ते कार काढून बाहेर पडले. खासगी रुग्णालयांना मदत मागितली आणि कारमधून १२ सिलिंडर आणले. कफील यांचा एक कर्मचारी सशस्त्र सुरक्षा दलाचे डीआयजीकडे गेला. त्यावर डीआयजींनी तत्काळ १० सिलिंडर दिले, सोबत एक ट्रकही दिला.