तुम्ही पाहिले आहे का बिग बींनी गायलेले सांकेतिक राष्ट्रगीत !


सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताच्या व्हिडिओचे नुकतेच केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी अनावरण केले. बिग बी अमिताभसह दिव्यांग मुलांनी यात सहभाग घेतला आहे. कोल्हापुरातील चेतना विकास मंदिर या शाळेच्या ८ विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे.

गोविंद निहलानी यांनी सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताच्या या व्हिडिओचे दिग्दर्शन केले असून अमिताभ बच्चन यांनी दिव्यांग मुलांसह हे राष्ट्रगीत गायन लाल किल्याच्या पार्श्वभूमीवर केले आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्री महेंद्र नाथ पांडे यावेळी बोलताना म्हणाले, शारीरिक व्यंग असणाऱ्या मुलांना सरकार दिव्यांग असे संबोधते. सांकेतिक भाषेवर जे लोक अवलंबून आहेत, त्यांच्यासाठी हा एक अभिमानाचा क्षण आहे. हा व्हिडिओ गोवा, भोपाळ, चंदिगड आणि कोल्हापुरात लाँच केला जाणार आहे.

चेतना विकास मंदिराच्या सुशांत कुंदे, वन्या करकरे, निखील डाफळे, अनिशा सुतार, विशाल मोरे, आम्रपाली कांबळे, विनम्र खटावकर, प्रतीक्षा कराळे यांचा या व्हिडिओत सहभाग आहे. त्यासोबतच अॅडॅप्ट ( मुंबई ), हेलन केलर इन्स्टीट्यूट फॉर द ब्लाईंड ( मुंबई ), कमला मेहता दादर स्कूल फॉर द ब्लाईंड ( मुंबई ), किर्ती कालरा व सिमरन कारला ( दिल्ली ) या शाळातील मुलांचाही सहभाग आहे.