१०६ वर्षांपूर्वीचा केक आजही जैसे थे…


ख्राइस्टचर्च – आजकाल दोन दिवस जूना पावही किंवा कालची भाकरीही खाल्ली जात नाही आणि अशात तुमच्या समोर जर १०६ वर्षे जुना पदार्थ समोर ठेवलात तर तुम्ही कसे नाक मुरडाल हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. पण संशोधकांना अंटारर्क्टिकावर १०६ वर्षे जुना केक सापडला असून हा फ्रुटकेक नीट जपून ठेवल्यामुळे खाण्यायोग्यही असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. अंटार्क्टिका हेरिटेज ट्रस्टचे संशोधक अंटार्क्टिकावर भटकंती करत असताना त्यांना केप अदारे हट येथे एक व्यवस्थित टिकवून ठेवलेला फ्रुटकेक दिसला. १८९९ साली ही जागा तयार करण्यात आली होती आणि रॉबर्ट फाल्कन स्कॉट यांची १९११ साली मोहीम यशस्वी झाल्याबद्दल आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हा फ्रुटकेक आणला असावा असा अंदाज आहे.

ट्रस्टच्या व्यवस्थापक लिझी मिक यांनी या केकवर गुंडाळलेल्या कागदावर अजूनही हंटले अॅंड पामर्स कंपनीची चिन्हे असल्याचे सांगितले. तो केक अजूनही केक नवाच दिसतो. थोडासा तुपाचा ओशट वास सोडला तर तो एकदम सुंदर दिसतो असे मिक यांनी मत व्यक्त केले आहे. संशोधकांना तो केक खाण्यायोग्य वाटत असला तरी तो खाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. हा केक ज्या डब्यात होता त्याला अजिबात धक्का लागलेला नव्हता, अतिशय थंड तापमानामुळे तो टिकून राहिला असे मिक यांनी सांगितले.

Leave a Comment