पावसाचा आनंद घ्या पण जरा बेताने…


आजुबाजुला दाटलेली हिरवळ, धुक्‍याची पसरलेली चादर आणि त्यात धबधब्याच्या पाण्याचे अंगावर पडणारे तुषार, अशा पावसाच्या विलोभनीय वातावरणाचा आनंद घेतांना काही बाबींचं भान राखायला हवं. पावसाच्या चांगल्या हजेरीमुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. अनेक नद्या, नाले, धबधबे दुथडी भरून वाहत आहेत. तरूणाईसाठी तर अशा ठिकाणच्या सहलीची मजा काही औरच असते. त्यामुळे अशा ठिकाणी तरूणाई मोठ्या संख्येनं मौजमजा करताना दिसते. त्यात आकाशातून कोसळणारा पाऊस आणि धबधब्यातलं भिजणं अवर्णनीय आनंद देऊन जातं. मात्र, धबधब्यात भिजणं कितीही थ्रीलिंग असलं तरी सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं असते. धबधब्याच्या पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे मित्रानो, तुम्ही अशा ठिकाणी जाण्याचा बेत आखत असला तर विशेष काळजी घेण्याचं भान अवश्‍य ठेवा

* धबधबा, नदी किंवा तलावात कोणी बुडत असेल तर पूर्वतयारीशिवाय बचावासाठी पाण्यात उतरू नका. त्याऐवजी जोरात ओरडाओरडा करा. आसपासच्या लोकांमधल्या कोणाला वाचवण्याचा अनुभव असेल तर ते तुमच्या मदतीला येऊ शकतील किंवा बचाव पथकाशी संपर्क करू शकतील.

* धबधब्यावर भिजायला जाताना मोठा दोरखंड सोबत न्यायला विसरू नका. हा दोरखंड सुमारे 20 मीटर लांब असावा. पाण्यात उतरण्याआधी हा दोरखंड एखाद्या खडकाला किंवा झाडाला बांधून ठेवा. यामुळे बुडणाऱ्याला दोरखंडाचा आधार देता येईल. बुडणाऱ्यांच्या सुटकेसाठी येणाऱ्या टीमलाही या दोरखंडाचा वापर करता येईल.

* तुमच्याकडे दोरखंड असेल तर त्याचं एक टोक बुडणाऱ्या व्यक्‍तीच्या दिशेने टाका तर दुसरं टोक झाड किंवा खडकाला बांधा. लोकांच्या मदतीने दोरखंड ओढून बुडणाऱ्या व्यक्‍तिला बाहेर काढता येईल.

* धबधब्यातील खडकावर उभे राहून फोटोग्राफी करत असाल तर विशेष काळजी घ्या. कारण यावेळी आपलं सगळं लक्ष फोटोकडे केंद्रित झालेलं असतं. त्यामुळे अचानक येणारा प्रवाह किंवा निसरड्या खडकाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि अपघात होण्याची शक्‍यता असते.

* मुख्यत्वे धबधबा चार फुटांपेक्षा जास्त खोल असेल तर पोहायला न उतरणंच हिताचं ठरेल. मात्र, पोहण्याचा मोह आवरला नाही तर लाकडी फळी किंवा टायर सोबत घ्यायला हवा.

* तुम्ही पोहण्यात कितीही तरबेज किंवा फिट असलात तरी निसर्गाच्या या रूपात कधी काय होईल, हे सांगता येणं कठीण आहे. पोहताना अचानक पायात गोळा येऊ शकतो. जोराचा प्रवाह तुम्हाला वाहवत नेऊ शकतो. त्यामुळे पोहताना किती दूर जायचं, पोहण्याचा वेग किती हवा, याचा विचार करायला हवा.

Leave a Comment