भाजप नव्या प्रदेशाध्यक्षाच्या शोधात


दानवेंची केंद्रात वर्णी ? विनोद तावडेंच्या नावाची चर्चा
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे हे त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे गेले वर्षभर चर्चत आहेत. केंद्रात आणि राज्यात आगामी काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे आहे. मंत्रिपदाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या नेत्यांचे या विस्ताराकडेही लक्ष लागले आहे. दानवे यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दानवे यांच्या जागी नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध भाजपने सुरू आहे.

महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष मराठाचा हवा असल्याने योग्य अशा नेत्याच्या शोधात भाजप आहे. प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वी दानवे हे केंद्रात राज्यमंत्री होते. तेथे त्यांचे मन फार रमले नाही. “दिल्लीत दाढीवाला फार काही काम करू देत नाही,’ अशी गमतीशीर टिप्पणीही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुण्यात एका कार्यक्रमात केली होती. तरीही दानवे यांना पुन्हा दिल्लीत काम करावे लागण्याची शक्‍यता आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात “लक्ष्मीदर्शना’चे विधान किंवा शेतकऱ्यांबद्दल केलेले वादग्रस्त विधान यामुळे त्यांच्यावर टीका झाली. शेतकऱ्यांवरही त्यांनी वादग्रस्त विधाने केली. सोशल मिडियात लक्ष्य होणाऱ्या भाजपच्या नेत्यांत दानवे हे “आघाडीवर’ आहेत.
आपल्या कारकिर्दीत दानवे यांनी भाजपला महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत चांगले यश मिळूवन दिले. भाजपकडे राज्यात चांगल्या वक्‍त्यांची संख्या कमी आहे. दानवे हे ग्रामीण भागात लोकप्रिय अशा वक्‍त्यांपैकी आहे. त्यामुळे दानवे यांच्याजागी दुसरा चेहरा शोधणे पक्षापुढचे आव्हान आहे. राज्यात मराठा मोर्चांमुळे वातावरण तापलेले आहे. असे असताना प्रदेशाध्यक्ष पदावर मराठा समाजाचा नेता असावा, अशीही मांडणी होत आहे. भाजपचा राज्यातील चेहरा बदलण्यासोबतच राज्याच्या मंत्रिमंडळातही या निमित्ताने काही बदल घडू शकतात.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी विनोद तावडे यांच्याकडे ही जबाबदारी येऊ शकते, असेही चर्चा भाजपमध्ये आहे. मात्र भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे काय निर्णय घेतील, याचा अंदाज कोणीच वर्तवू शकत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रदेशाअध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार हे तरी सध्या गुलदस्तात आहे.