पुण्यात खंडपीठ झालेच पाहिजे; मुख्यमंत्र्यांसमोर वकीलांची घोषणाबाजी


पुणे – पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ झालेच पाहिजे, अशी घोषणाबाजी वकिलांनी शिवाजीनगरच्या न्यायालयात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्तींशी पुण्यातील खंडपीठाबाबत चर्चा करू असे केवळ आश्वासनच उपस्थित वकिलांना दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज पुण्यातील शिवाजीनगर येथील न्यायालयात कुटुंब न्यायालयाच्या नव्या इमारतीचे हस्ते उद्घाटन झाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती मंजूळा चेल्लूर यांची यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थिती होती. तसेच पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक हे देखील उपस्थित होते. या दरम्यान येथील वकिलांना या कार्यक्रमात पुण्यातील खंडपीठाबाबत मुख्य न्यायमूर्ती काहीतरी माहिती देतील अशी अपेक्षा होती. पण तसे काहीच झाले नसल्याने नाराज झालेल्या वकिलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजीला सुरुवात केली.