विदर्भातील गोंदिया जिल्हयातील खोडशिवनी या छोट्याशा गावातील मेश्राम कुटुंबात सर्व जग सामावले असल्याचे सांगितले तर खरे वाटणार नाही. मात्र या कुटुंबातील मुख्य सुभद्राबाई यांनी हा पराक्रम करून दाखविला आहे व त्यांच्यानंतर आता त्यांच्या वारसांनीही सुभद्राबाईंनी घालून दिलेली परंपरा कायम राखली आहे. मेश्राम परिवारातील मुलामुलींना देश, खंडांची नांवे दिली गेली आहेत व अशा पध्दतीने त्यांनी या कुटुंबात जगाचा समावेश केला आहे.
विदर्भातील मेश्राम कुटुंबात सामावले आहे सारे जग
मेश्राम कुटुंबातील सुभद्राबाईंचा ५० वर्षाचा मुलगा भारत सांगतो, माझे नांव भारत आहे तर माझ्या मोठ्या बहिणींची नांवे रशिया व अमेरिका आहेत. धाकट्या बहीणी आशिया व अफ्रिका आहेत. भारत यांनी त्यांच्या मुलाचे नांव युरोप ठेवले आहे तर अमेरिका नावाच्या बहिणीने तिच्या मुलांची नांवे राज्यपाल व राष्ट्रपती ठेवली आहेत. सुभद्राबाईंनी हा निर्णय एका खास विचाराने घेतला होता व तीच आता या घराची परंपरा बनली आहे. अर्थात भारत यांना त्यांच्या नावामुळे खूप चेष्टा सहन करावी लागली त्यामुळे त्यांचे नांव बदलून सुभाषचंद्र बोसांवरून सुभाष केले गेले.
भारत सांगतात आम्ही दलित आहोत. माझी आई दाई म्हणून काम करत असे. त्याकाळी खडोपाडी आरेाग्यासाठी खास सुविधा नव्हत्या व त्यामुळे माझ्या आईने अनेक उच्चनीच कुटुंबात सुईण म्हणून काम करताना अनेक बाळांना जगात आणण्याचे काम केले आहे. तेव्हा डॉ.आंबेडकर समाजातील उच्चनीचते विरोधात संघर्ष करत होते व त्यानी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यावेळी माझ्या आईला असे वाटले की जन्माला येणारी सगळी मुले सारखीच आहेत मग त्यांच्यात भेदभाव का असावा? यासाठी तिने मुलांची नांवे देश व खंडांवरून ठेवली. जगातले सर्व खंड एका छताखाली आणण्यासाठी या कुटुंबाला ३३ वर्षे लागली असेही ते मजेने सांगतात.