नेहरू ट्रॉफी बोटरेसची मजा चाखा अलेप्पीमध्ये


गॉडस ओन कंट्री केरळमध्ये दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या नेहरू ट्रॉफी या जागातिक प्रसिद्धीच्या बोट रेस यंदा १२ ऑगस्टला होत असून त्यासाठी जगभरातून पर्यटक येथे आले आहेत. भारताचे व्हेनिस म्हटल्या जाणार्‍या अलेप्पीतील वेंबनाड सरोवरात आज या रेसची धमाल अनुभवता येणार आहे. या भागात पाण्यातच बोटीच्या सहाय्याने सर्व आयुष्य जगणारी माणसे राहतात. हे सरोवर भारतातील सर्वात मोठे व लांबीचे सरोवर आहे. संपूर्ण जिल्ह्यात ते पसरलेले असून ते पुन्नामुडा, कोच्ची सरोवर या नावानेही परिचित आहे.

दरवर्षी येथे ओणम या सणाच्या निमित्ताने नौकानयन स्पर्धा होतात. तसेच नेहरू ट्रॉफी स्पर्धा येथे १९५४ पासून भरविल्या जात आहेत. विविध भागातील अनेक नावा या ऐतिहासिक रेसमध्ये सामील होण्यासाठी येतात. दर्शकांना या स्पर्धेचा थरार व रोमांच स्वतःकडे खेचून घेतो. नेहरू ट्रॉफी रेससाठी १.४ किमीचा पाणमार्ग असतो व त्यात १०० ते १२० फूट लांबीच्या लाकडी बोटी ९० ते १०० लोक एकसाथ चालवितात हे दृष्य मोठे मनोहर दिसते.


हा भाग अन्य पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. या सरोवराच्या पूर्व भागात स्थलांतरीत पक्षी पाहता येतात तेथील कुमारकोम अभयारण्य यासाठी प्रसिद्ध आहे. येथे हाऊसबोटीतून राहण्याची उत्तम व्यवस्था असते व हाऊसबोटीतूनच या परिसराचा फेरफटका करता येतो.