शौचालयाचे महत्त्व सांगणारा ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’


बॉक्स ऑफिसवर आज अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून खेडेगावातील महिलांची शैाचासंबंधीच्या समस्या मांडणारा हा चित्रपट खळखळून हसवणारा देखील आहे. पण या चित्रपटाच्या माध्यमातून शौचालयाचे महत्त्व अन देशातील महिलांच्या अन महिलांविषयीच्या मानसिकतेवरही बोट ठेवले आहे. त्यामुळे ही कहाणी फक्त ‘शौचा’लयाची नसून ‘सोच’ बदलणारी आहे. हा चित्रपट देशातील महिला आणि पुरुषांच्या विचारसरणीवर आणि सांस्कृतिक सभ्यतेवरही बोट ठेवतो. शौचासंबंधी खेडेगावातील महिलांना येणाऱ्या अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि त्यातून होणाऱ्या अत्याचारांनाही यामध्ये स्पर्श करण्यात आला आहे.

या चित्रपटाची कथा उत्तरप्रदेशातील एका गावात घरात किंवा गावात शौचालय नसल्याने विवाहिता सासर सोडून माहेरी गेली यावर बेतलेला असून पत्नीला परत आणण्यासाठी पती गावात सर्वांसाठी शौचालय व्हावे, म्हणून कसा लढा देतो, हे या चित्रपटामध्ये पाहता येते. पती पत्नीभोवती असलेल्या या चित्रपटात केशव घरात शौचालय बांधतो का? गावासाठी सार्वजनिक शौचालय उभारले जाते का? यासाठी तुम्हाला थिएटरमध्येच जावे लागेल.

भूमी पेडणेकर ही गुणी अभिनेत्री चित्रपटात स्वत:भोवती खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते, कारण ती ताकदीचा अभिनय करू शकली आहे. अक्षय कुमार, अनुमप खेर आणि सहकलावंतांचा अभिनय उत्तम झाला असून अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर या दोघांनीही ताकदीने भूमिका साकारल्या अन केमिस्ट्री उत्तम जुळून आली आहे. ७० टक्के कृषीप्रधान आणि गावखेड्यांत वसलेल्या भारतातील महिलांच्या महत्त्वाच्या समस्येकडे लक्ष वेधणारा हा चित्रपट खेड्यांत विशेष लोकप्रिय होईल.

चित्रपटाचे दिग्दर्शन श्री नारायण सिंग यांनी उत्तम केले असून त्यांनी चित्रपटातील वास्तवतेला छेद जाणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली आहे. कलावंतांची निवड, पटकथेची मांडणी अचूक झाली आहे. चित्रपटातील संवाद हे सर्वात मोठे बलस्थान आहेत. चित्रपटात मोजकीच गाणी आहेत. आशयसंपन्न गाणी असली तरी ती फार लोकप्रिय होतील अशी नाहीत. पण, चित्रपटाला पुढे नेण्यात चांगली झाली आहेत.

टॉयलेट – एक प्रेम कथा ची बॉलीवूड कलाकारांनी केली हटके जाहिरात.