स्मार्टफोन हब इंडिया


गेल्या काही वर्षात भारतात स्मार्ट फोनच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून भारताला स्मार्ट फोन निर्मितीचे आगार म्हणून ओळखले जायला लागले आहे. या व्यवसायात होणारी उलाढाल १४० अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. ही उलाढाल वट्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.५ टक्के एवढी आहे. एका लहान समजल्या जाणार्‍या व्यवसायातून एवढी मोठी उलाढाल ही आश्‍चर्यजनक ठरली आहे. या व्यवसायात होत असलेली वाढही अशीच आश्‍चर्यकारक असून ती २०२० सालपर्यंत २०० अब्ज डॉलर्सवर जाऊन पोचेल तेव्हा ती वट्ट राष्ट्रीय उत्पन्नाच्या ८.२ टक्के राहणार आहे. हा आकडा रुपयांत मोजायचा झाला तर जवळपास १३ लाख कोटी रुपये एवढा होतो. तसा तो पाहिला तर आपल्याला या व्यवसायाची व्याप्ती किती आहे याची नेमकी कल्पना येते.

अर्थात या क्षेत्रात एवढी मोठी उलाढाल होत असेल तर त्याच प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असणार. या क्षेत्रात गेल्या दोन वर्षात ३८ हजार ३०० लोकांना नोकर्‍या मिळाल्या आहेत. तैवानच्या फॉक्सकॉन या कंपनी या बाबत आघाडीवर आहे. या एकट्या समूहाने ८ हजार लोकांना रोजगार दिलेला आहेे. भारतात होत असलेेले हे उत्पादन बाहेरच्या देशात तर निर्यात होतेच पण मुळात भारतातच त्याला फार मागणी असते कारण भारत हे स्मार्ट फोनचे अमेरिकेच्या खालोखालचे म्हणजे दुसर्‍या क्रमांकाचे मार्केट आहे. आता सरकारलाही या उद्योगाचे महत्त्व लक्षात आले असून सरकारने या क्षेत्राला काही सवलती देऊन व्याप वाढवण्यास मदत करण्याचे ठव्विले आहे. त्यासाठी या धंद्याला मेक इन इंडिया या योजनेत समाविष्ट करण्याच्या दिशेने सरकार पावले टाकत आहे.

भारतात हा धंदा असा तेजीत चालत असला तरीही त्यात काही कमतरता आहेत. स्मार्ट फोन तयार करण्याचा हा उद्योग एवढा भरभराटीला आला असला तरीही फोनचे सुटे भाग पूर्णपणे भारतात तयार होत नाहीत. हे सुटे भाग बाहेरच्या देेशांतून आयात केले जातात आणि त्यांची जुळणी भारतातल्या या कारखान्यांत होते. मात्र आयात केले जाणारे ेहे सुटे भाग भारतातच तयार केले तर त्याही निमित्ताने काही उद्योग भारतात उभे राहतील. त्यात अनेकांना नोकर्‍या मिळतील आणि या सुट्या भागांच्या आयातीवर होणारा परदेशी चलनांतला खर्च वाचेल. म्हणून सरकार हे सुटे भागही भारतातच तयार करता येतील काय यावरही विचार करीत आहे. एकंदरीत या व्यवसायाचा व्याप मोठा वाटत असला तरीही तो आणखीही वाढवता येतो.

Leave a Comment