बाबा रामदेवांनी सुरु केली धार्मिक वाहिनी


नवी दिल्ली – योग गुरू असणा-या बाबा रामदेव यांनी आणखी एका क्षेत्रात उडी मारली असून रामदेव यांनी नवीन धार्मिक वाहिनी सुरू केली. त्यांनी या चॅनेलचे नाव ‘वेदिक’ असे ठेवले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या वेद, दर्शन, उपनिषद, रामायण, महाभारत आणि गीता यांचे शिक्षण घेता येईल असे त्यांनी ट्विटरवर म्हटले.

हा चॅनेल सध्या टाटा स्कायवर १०७८ क्रमांकावर पाहता येईल. या चॅनेलच्या माध्यमातून त्यांना आपल्या योग आणि पंतजलीच्या उत्पादनांचा प्रसार करता येईल. कंपनीकडून सध्या अनेक वाहिन्या आणि वृत्तपत्रात जाहिराती देण्यात येतात. पण आता त्यांचे स्वतःचेच चॅनेल असल्याने या उत्पादनांच्या जाहिरातींवर अधिक भर देण्यात येईल. ट्विटरवर ही घोषणा करण्यात आल्यानंतर अनेकांनी त्यांना प्रतिसाद दिला आहे. पतंजलीकडून अगोदरच एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांना जोरदार टक्कर देण्यात आली आहे. याचा फटका त्यांना बसला आहे.