भगवान कल्कीचे एकमेव मंदिर


हिंदू पुराणानुसार विष्णुचे दशावतार होणार असून त्यातील नऊ अवतार झाले आहेत तर दहावा कल्कीचा अवतार कलीयुगाच्या अखेरी होणार आहे व त्यानंतर सत्ययुगाचा प्रारंभ होणार आहे. विष्णुपुराणात या दहाव्या अवताराचे वर्णन आले असून त्यात संभल ग्राममध्ये विष्णुयश या श्रेष्ठ ब्राहमणाच्या घरी मुलाच्या स्वरूपातील पांढर्‍या देवदत्त घोड्यावर बसून हा अवतार येईल. त्याच्या हातात कराल म्हणजे अतिभव्य अशी तलवार असेल व तो दुष्टांचा संहार करेल.


कल्कीला निष्कलंक भगवान असेही म्हणले जाते. या कल्कीचा अवतार अजून झालेला नसल्याने देशात त्याची कुठेही मंदिरे नाहीत. मात्र जयपूर शहर वसविणारे सवाई जयसिंह यांनी मात्र शहरातील प्रसिद्ध हवामहल च्या समोर कल्की मंदिर बांधले. हे देशातील पहिले व एकमेव मंदिर मानले जाते. १७३९ साली हे मंदिर दाक्षिणायन शिखर शैलीत बांधले गेले आहे. त्याच्यासमोर संगमरवरातील घोड्याची मूर्ती आहे. या मंदिराच्या दोन शिखरांपैकी मागचे शिखर लक्ष्मी निवास मानले जाते तर पुढचे उंच शिखर कल्कीमंदिराचे आहे.

या देवळात अद्याप मूर्ती नाही तसेच येथे पूजा अर्चाही केली जात नाही. इतकेच नव्हे तर हे मंदिर पाहण्यासाठीही खूले नाही. ते बंद अवस्थेच आहे. येथील पुजारी कांही कांही दिवसांनी मंदिर उघडतात व तेथील साफसफाई करतात असे समजते. कल्की अवतार अजून झाला नसल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले नाही असे सांगितले जाते.

Leave a Comment