पिंपळवृक्षाचे औषधी गुणधर्म


पिंपळ हा भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष, बोधी वृक्ष या नावानेही ओळखला जातो. कारण भगवान बुद्धाना ज्ञानाची प्राप्ती पिंपळ वृक्षाखालीच झाली होती. हा वृक्ष केवळ हवा शुद्ध करणारा नाही तर त्यात अनेक औषधी गुणधर्मही आहेत. आयुर्वेदातील अनेक औषधे यापासून बनतात तसेच हा वृक्ष दिवसा व रात्रीही ऑक्सिजन वायूच बाहेर टाकतो त्यामुळे हवेचे शुद्दीकरण होत राहते. अनेक प्रकारच्या व्याधी दूर करण्यासाठी पिंपळाची पाने, साल वापरली जाते.

हृदय विकारापासून दूर राहण्यासाठी पिंपळाची ताजी १० ते १५ पाने १ ग्लास पाण्यात उकळून ते मिश्रण एक तृतीयांश होईपर्यंत आटवावे. नंतर ते गाळून गार झाल्यावर तीन सम भागात सकाळच्या वेळात दर तीन तासांनी घ्यावे. यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.

दांत मजबूत व पांढरे शुभ्र दिसण्यासाठी पिंपळ सालाची राखुंडी बनवून वापरावी. त्यासाठी १० ग्रॅम साल, कात व २ ग्रॅम काळी मिरी एकत्र करून त्याची बारीक पूड करावी व हे मंजन वापरून दात घासावेत. दात मजबूत हेातील. पिंपळाच्या पानांचा रस कावीळीवर उपयुक्त आहे.

ज्यांना दमा, अस्थमाचा त्रास आहे त्यांनी पिंपळाच्या सालीच्या आतला गाभा काढून वाळवावा. त्यानंतर त्याचे बारीक चूर्ण करून पाण्यासोबत घेतल्याने दम्याचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर हवा बदलल्याने होणारी सर्दी, खोकला, पडसे यावर पिंपळाची ५ पाने दुधात उकळून ते साखरेसह सकाळ सायंकाळ घ्यावे.