फेसबुकच्या छायाचित्रांवरून कळते नैराश्य !


एखाद्या व्यक्तीच्या फेसबुक किंवा इन्स्टाग्राम खात्यावरील छायाचित्रांवरून ती व्यक्ती नैराश्यग्रस्त आहे का नाही, हे आता कळू शकणार आहे.शास्त्रज्ञांनी यासाठी खास संगणक कार्यक्रम तयार केला असून डॅाक्टरांपेक्षा तो अधिक चांगले निदान करू शकतो, असा त्यांचा दावा आहे.

हा कार्यक्रम 70 टक्क्यांपर्यंत तणावग्रस्त लोकांचे निदान करू शकतो, असा तो बनविणाऱ्यांचा दावा आहे.

अमेरिकेतील व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधक ख्रिस्टोफर डेनफोर्थ यांनी हे संशोधन केले आहे. त्यांच्या मते, “प्रसिद्ध सोशल मीडिया अॅपवरील काही लोकांच्या खात्यांचे विश्लेषण आम्ही केले. त्यात आम्हाला आढळले, की नैराश्यग्रस्त लोकांच्या छायाचित्रांचा रंग गडद होता. त्यांच्यावर लोकांनी अधिक टिप्पणी केल्या होत्या. त्यात चेहरे अधिक दिसतात आणि फिल्टरचा वापर कमी केलेला होता.”

या लोकांनी फिल्टरचा वापर करतानाही फक्त ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी केला होता. नैराश्यग्रस्त लोकांनी अन्य लोकांच्या तुलनेत अधिक पोस्ट केल्या होत्या,” असे डेनफोर्थ म्हणाले.

फेसबुक व इन्स्टाग्रामच्या अॅपचा वापर करणाऱ्या 166 वापरकर्त्यांच्या 43,950 छायाचित्रांचे विश्लेषण केले. त्यासाठी या संगणक कार्यक्रमाचा वापर करण्यात आला. यात 71 अशा व्यक्ती होत्या ज्यांची वैद्यकीय तपासणी करून ते नैराश्यग्रस्त असल्याचे आढळले होते.

‘ईपीजे डाटा सायन्स’ नावाच्या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment