इंग्लंडच्या राणी समोर करावे लागते या नियमांचे काटेकोरपणे पालन.


इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ आज ९१व्या वर्षीही दररोज अनेक देश-विदेशातील असंख्य राजकीय नेत्यांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना भेटत असते. अगदी आम जनतेला आमोरासमोर भेटण्याचे प्रसंगही ब्रिटीश शाही परिवारावर वरचेवर येत असतात. मात्र राणीला भेटयाला जाणाऱ्या सर्वच व्यक्तींना काही नियमांचे आवर्जून पालन करावेच लागते.

राणी कुणासही भेटण्यास पुढे आली असता तिने ‘हँड शेक’ करिता हात पुढे केल्याशिवाय समोरच्या व्यक्तीने हात पुढे करावयाचा नसतो. त्याचबरोबर राणीने दालनामध्ये प्रवेश केल्यानंतर कुणीही खुर्चीवर बसून न राहता उठून उभे राहिले पाहिजे आणि राणी स्थानापन्न झाल्यानंतर मगच सर्वांनी आपापल्या आसनावर बसावे असा दंडक आहे.

जर एखादी व्यक्ती अमेरिकन नागरिक असेल तर राणी ला अभिवादन म्हणून केवळ ‘हँड शेक’ चालतो, पण एखादी व्यक्ती ब्रिटीश नागरिक असल्यास त्यांनी राणीला झुकून अभिवादन करणे अगत्याचे आहे. अगदी उर्वरित शाही परिवारही याला अपवाद नाही. तसेच औपचारिक भेटीसाठी येत असताना ड्रेस कोड चे पालन करणे बंधनकारक आहे.

राणीच्या भेटीस येताना भेटवस्तू आणणेही अगत्याचे आहे. पण भेटवस्तू, कार्यक्रमाचे प्रयोजन लक्षात घेवून त्या अनुषंगाने आणलेली असणे आवश्यक असते. राणी एखाद्या टिकाणी भेटीस गेल्यानंतर तेथील परंपरा किंवा संस्कृती दर्शविणारी एखादी भेट वस्तू दिली जाणे अपेक्षित असते.

शाही, औपचारिक मेजवानीच्या वेळी राणीने जेवणास सुरुवात करण्यापूर्वी इतर कोणासही जेवण सुरू करण्याची परवानगी नसते. त्याचबरोबर राणी चे जेवण संपल्याबरोबर इतर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांनाही आपले जेवण संपावे लागते. जेवताना काटे चमच्यांचे आवाज कमीतकमी होतील याची प्रत्येकालाच काळजी घ्यावी लागते.

राणीने संभाषणास सुरुवात करण्यापूर्वी इतरांनी संभाषण सुरु करू नये असा दंडक आहे.संभाषण करताना देखील राणीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे इतकेच फक्त अपेक्षित असते. त्या व्यतिरिक्त इतर संभाषण टाळावे लागते. त्याचबरोबर राणी काही ठिकाणी फिरून जर एखादी जागा पाहत असेल तर त्या जागेबद्दल माहिती देत असलेल्या व्यक्तीने राणीच्या मागे न चालता, तिच्या बरोबरीने चालत तिला हवी असलेली सर्व माहिती देणे किंवा तिने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे अगत्याचे असते.

Leave a Comment